दौंड तालुक्यातील व्हिक्टोरिया तलावात केवळ 25 टक्के साठा

दौंड तालुक्यातील व्हिक्टोरिया तलावात केवळ 25 टक्के साठा
Published on
Updated on

खोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणार्‍या वरवंड (ता. दौंड) येथील व्हिक्टोरिया तलावात ऐन पावसाळ्याच्या कालावधीत केवळ 25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी वर्गाच्या खरीप हंगामाच्या पेरण्यादेखील रखडल्या गेल्या आहेत. परिणामी, दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी पावसाच्या अभावामुळे चिंतातूर झाला आहे.

वरवंड येथील व्हिक्टोरिया तलाव हा दौंड तालुक्याबरोबरच बारामती तालुक्याला पाणीपुरवठा करणारा सर्वांत मोठा तलाव मानला जातो. जवळपास 310 एकरांमध्ये विस्तार असलेल्या या तलावात खडकवासला धरण साखळीतून खरीप, रब्बी व उन्हाळी या तीन आवर्तनांसाठी दौंड तालुक्याला 11.08 टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. मुठा उजवा कालव्यातून वरवंड येथील तलाव भरण्यात येत असतो. जवळपास 310 एकरात विस्तार असलेल्या या तलावाची साठवण क्षमता 200 दशलक्ष घनफूट आहे.

या तलावाच्या माध्यमातून कुरकुंभ औद्योगिक वसाहत, वायनरी प्रकल्प, जनाई शिरसाई योजना व दौंड तालुक्यातील इतर गावांबरोबरच बारामती तालुक्यालादेखील पाणी पुरविण्यात येत असते. मात्र, आजच्या परिस्थितीला शेतकरीवर्गाची जीवनदायनी ठरत असलेल्या तलावातच केवळ 25 टक्के इतका मर्यादित पाणीसाठा उरला असल्याने शेतकर्‍यांची पुढील सर्व आर्थिक उलाढालीची गणिते कोलमडली आहेत.

व्हिक्टोरिया तलावातून दौंड तालुक्यातील पाटस, कुसेगाव, खोर, पडवी, वरवंड, कडेठाण, देऊळगावगाडा, कानगाव या 8 गावांना पाणी दिले जाते. पाटस, गिरीम हद्दीतील तसेच भिगवण शाखा कालव्याचे सिंचन व्यवस्थापन सुरू आहे. वरवंडच्या पुढील भागातील सिंचन पूर्ण होत आलेले असून, वरवंड तलावात सोडण्यात येणारे पाणी टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत असते. मात्र, तलावात सद्यस्थितीत अत्यल्प पाणीसाठा असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

वरवंडच्या व्हिक्टोरिया तलावात केवळ 25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला धरण साखळीतून येथील तलावात आवर्तन कधी सोडले जाईल याबाबत अजून तरी निश्चित झालेले नाही. तसेच पाऊसदेखील लांबणीवर पडला असल्याने दिवसेंदिवस तलावातील पाणीसाठ्यात घट होत आहे.

– राहुल वर्‍हाडे, शाखा अधिकारी, खडकवासला पाटबंधारे विभाग, वरवंड.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news