दरडप्रवण क्षेत्रात खेडमधील 2 गावे; शेलपिंपळगाव येथे मॉक ड्रिल

दरडप्रवण क्षेत्रात खेडमधील 2 गावे; शेलपिंपळगाव येथे मॉक ड्रिल

चाकण(पुणे); पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील प्रशासन काही प्रमाणात सज्ज झाल्याचे चित्र आहे. दरडप्रवण गावांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात खेडमधील दोन गावांचा समावेश आहे. इर्शाळवाडीप्रमाणे घटना पुण्यातील ग्रामीण भागात घडू नये, यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्हा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी पूर आणि भूस्खलनाच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी खेड तालुक्यात मॉक ड्रिल आयोजित केले होते.

जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार जिल्ह्याच्या इतर भागांतही मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व सरकारी विभाग यात सहभागी झाले होते. खेड तालुक्यातील भीमा-भामा नदी संगमावरील शेलपिंपळगाव गावात पूरस्थिती हाताळण्याची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आले. आरोग्य विभाग आणि चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्यासह अधिकारी यात सहभागी झाले होते.

पदरवस्ती, भोमाळे धोकादायक

पुणे जिल्ह्यातील संभाव्य दरडप्रवण गावांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यात खेड तालुक्यातील भोरगिरी येथील पदरवस्ती व भोमाळे या गावांचा समावेश आहे. त्यातच खेडच्या वनहद्दीत अनेक ठिकाणी पवनचक्क्या उभारल्याने डोंगर सैल झाले आहेत. खेड आणि मावळ या दोन तालुक्यांतील 28 गावांच्या हद्दीतील वन विभागाच्या सुमारे 200 हेक्टर इतक्या राखीव वनक्षेत्रात इनरकॉन कंपनीला पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता दिली गेली. या प्रकल्पात संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. पवनचक्क्या उभारताना डोंगरमाथ्यावर अवजड यंत्रसामग्री व विविध वस्तू डोंगरमाथ्यावर नेण्यात आल्या. त्यासाठी प्रचंड उत्खनन करण्यात आले. त्याचे दुष्परिणाम पुढील काळात दिसण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news