पुणे : ढोल, ताशांची संख्या निश्चित करावी; कार्यकर्त्यांची मागणी

पुणे : ढोल, ताशांची संख्या निश्चित करावी; कार्यकर्त्यांची मागणी
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंडळांसाठी ढोल-ताशा पथकांची आणि पथकातील ढोल व ताशांची संख्या निश्चित करावी. ढोल-ताशा पथकांची संख्या मर्यादित ठेवली, तर मिरवणूक लवकर संपवता येईल, अशी भूमिका गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासन आणि मंडळांच्या बैठकीत गुरुवारी मांडली. हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर यांच्या पुढाकाराने टिळक रस्त्यावरील दुर्वांकुर हॉल येथे पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस सहआयुक्त डॉ. संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त आर. राजा आणि संदीपसिंग गिल, वाहतूक पोलिस उपआयुक्त विजयकुमार मगर तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिस आयुक्तालयात बुधवारी मानाच्या गणपतीच्या मंडळांची स्वतंत्र बैठक आधी घेतल्याने इतर मंडळांनी या बैठकीवर बहिष्कार घातला होता. याप्रकरणी पोलिसांनी पदाधिकार्‍यांकडे दिलगिरी व्यक्त करून गुरुवारी पुन्हा सर्वांच्या सहभागातून बैठक घेतली. गणेश मंडळांमध्ये भेदभाव करू नका, असे आवाहन सर्व मंडळांच्या वतीने करण्यात आले.

टिळक रस्त्यावरील मिरवणुकीतील मंडळांची संख्या आणि गर्दी वाढत असल्याने त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, अशी सूचना ग्राहक पेठ मंडळाचे सूर्यकांत पाठक यांनी केली. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याआधी पोलिसांनी त्यांची पार्श्वभूमी तपासावी. अन्यथा त्यांचे करिअर धोक्यात येते, त्याबरोबर नुकतेच पकडलेले दहशतवादी त्यादृष्टीने मंडळांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले. याकडे अ‍ॅड. प्रतापसिंह परदेशी यांनी लक्ष वेधले.

साखळीपीर मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांनी काही सूचना केल्या. महापालिका आणि पोलिसांनी पाच वर्षांसाठी दिलेला परवाना 2027 पर्यंत वैध असताना दरवर्षी परवाना घ्यावा लागतो, याकडे खडकमाळ आळी मंडळाचे ऋषिकेश बालगुडे यांनी लक्ष वेधले. उत्सव काळात सुरक्षिततेसाठी चौकाचौकात एलइडी फलक लावून माहिती आणि सूचना देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

शहरात सापडलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव सुरक्षितपणे साजरा करण्यासाठी सर्व मंडळांचे सहकार्य अपेक्षित आहे. गणेश मंडळांच्या सूचनांनुसार लवकरच नियमावली तयार केली जाईल, तसेच पुढील बैठकीत धोरण ठरविण्यात येईल.

– डॉ. संदीप कर्णिक, पोलिस सहआयुक्त

मानाचे आणि इतर मंडळे असा भेदभाव नाही. सर्वच मंडळे मानाची आहेत. सर्व मंडळांच्या सहभागातून समिती तयार करून त्याद्वारे नियमावली ठरवण्यात यावी. सर्व मंडळांना नियम सारखे असावेत. सर्व मंडळांनी मिरवणूक संपवण्याची वेळ निश्चित करण्याची गरज आहे.

-श्रीकांत शेटे, अध्यक्ष, कसबा गणपती मंडळ

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news