पुणे : आणखी काही महिने करावा लागणार समस्यांचा सामना

पुणे : आणखी काही महिने करावा लागणार समस्यांचा सामना
पुणे; पुढारी वृत्तसेवा : कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा येथील खडी मशीन चौक या दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामाला 31 ऑक्टोबर 2018 रोजी मान्यता मिळाली असून, या भूसंपादन न झाल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी 710 कोटी हवे आहेत. भूसंपादनामुळे दीर्घकाळ रेंगाळलेल्या या रस्त्याची रुंदी 84 ऐवजी 50 मीटर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रस्त्याची रुंदी कमी केल्याने भूसंपादनाचा खर्च 280 कोटी रुपये इतका येणार होता. यांपैकी 200 कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळणार आहेत. हा निधी पुरवणी मागणीमध्ये मंजूर झाला आहे.
रस्त्याचे काम तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिला टप्पा इस्कॉन चौक ते टिळेकरनगर रस्ता या दरम्यानच्या जागामालकांना 27 कोटी रुपये रोख मोबदला दिला जाणार आहे. यापैकी पंधरा कोटी रुपये जागामालकांना देण्यात आले आहेत. दुसर्‍या टप्प्यात टिळेकरनगर रस्ता ते खडी मशीन चौक या दरम्यानची पाच एकर जागा टीडीआर आणि एफएसआयमार्फत ताब्यात घेण्यात येणार आहे, तर तिसर्‍या टप्प्यात राजस सोसायटी चौकाच्या परिसरातील 36 जागामालकांना 97 कोटी रुपये रोख स्वरूपात देण्यात येणार आहेत. त्यामुळे भूसंपादन होऊन रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीसह इतर समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

आजवर किती काम झाले?

  • शत्रुंजय मंदिर चौक ते टिळेकरनगर रस्ता या दरम्यान ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे.
  • टिळेकरनगर रस्ता ते भैरोबानाला या दरम्यान ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले असून, एका बाजूच्या सेवा रस्त्याचेही काम पूर्ण झाले आहे.
  • राजस सोसायटी चौक ते पॅरामाउंट सोसायटी या दरम्यान उजव्या बाजूचे काम टप्प्याटप्प्यामध्ये झाले आहे.
  • कपिला अमृत डेअरी ते बधाई स्वीटपर्यंत उजव्या बाजूची साइडपट्टी भरून रस्ता रुंद करण्यात आला आहे.
  • रस्त्यावरील खड्डे बुजवून डिव्हायडर तयार करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news