भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; आकुर्डीवासीय त्रस्त

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; आकुर्डीवासीय त्रस्त
आकुर्डी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आकुर्डी रेल्वे स्टेशन, गुरुद्वारा परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. कुत्र्यांचे टोळके अंगावर धावून येत असल्याने दुचाकीस्वारांना अपघातास सामोरे जावे लागण्याच्या घटना घडत आहेत.
वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी चौक, प्राधिकरण, पंचतारानगर, गंगानगर परिसरातील दुचाकीचालकांत भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतताना कुत्री अंगावर धाऊन येत असल्याने दुचाकीचालकांचा तोल जाऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. लहान मुलांवरही कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
प्राधिकरणातील हेडगेवार भवन, गुरुद्वारा परिसर, डॉ. डी. वाय. पाटीलरोड तसेच धर्मराज चौक या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांची दुकाने सुरू असल्याने उरलेले अन्न ते रस्त्यावर टाकत असल्याने परिसरात भटकी कुत्री जमा होतात, त्यामुळे येथे कुत्र्यांच्या उपद्रव वाढला आहे.
आकुर्डी परिसरात रात्रीच्या वेळी कुत्र्यांची टोळकी दुचाकीस्वारांचा पाठलाग करतात. काही ठिकाणी ही कुत्री दबा धरून बसतात व अचानक दुचाकीस्वारांच्या समोर येतात. त्यामुळे गोंधळून जाऊन दुचाकीस्वारांना अपघाताच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी कुत्र्यांची झुंडच बसलेली दिसते. गाडीचा प्रकाश दिसताच जणू काही सावजच येत आहे. गाडीसोबत धावतात. या परिस्थितीत दुचाकी जोरात दामटल्यास गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता असते.

कुत्र्यांचा प्रश्न गंभीर

भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना रात्री फिरायला जाणेही मुश्किल झाले आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.  त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातही कुत्र्यांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत.
माझे सलून आहे. त्यामुळे रात्री घरी यायला उशीर होतो. रात्री ही भटकी कुत्री रस्त्यावरून जाणार्‍या दुचाकी गाड्यांचा पाठलाग करतात. दुचाकी आली की, कुत्र्यांचे टोळके सावजावर हल्ला केल्यासारखे गाडीच्या मागे धावतात. 10 ते 11 कुत्री एकाच वेळी पाठलाग करतात. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना अपघातास सामोरे जावे लागले आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर संबंधित प्रशासन कारवाई करणार का?
– मनोज दळवी, 
नागरिक, विठ्ठलवाडी
आकुर्डी परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या लवकरच बंदोबस्त करू; तसेच निर्बीजीकरण करून त्यांचे लसीकरणही करण्यात येईल.
– अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी
मी सायंकाळी फिरायला जाताना मागून कुत्र्याने हल्ला करून माझ्या पायाचा लचका तोडला. माझे वय 80 आहे. कुत्रा चावल्याने इंजेक्शन घेण्यासाठी वायसीएम रुग्णालयात फेर्‍या माराव्या लागल्या. जखमेचा त्रास महिनाभर होता. चालताही येत नव्हते.
– मदनलाल कर्नावट, 
नागरिक, विठ्ठलवाडी
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news