नऊ खेळांच्या राष्ट्रीय शालेय स्पर्धाच रद्द ; लाखो खेळाडूंचे होणार नुकसान | पुढारी

नऊ खेळांच्या राष्ट्रीय शालेय स्पर्धाच रद्द ; लाखो खेळाडूंचे होणार नुकसान

सुनील जगताप

पुणे : राज्यात होणार्‍या 93 क्रीडा प्रकारांतील शालेय स्पर्धांपैकी 46 क्रीडा प्रकारांच्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा स्कूल फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होत असतात. मात्र, यावर्षीपासून या स्पर्धातून 9 खेळ वगळण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो खेळाडूंचे नुकसान होणार असल्याचे समोर आले आहे. स्कूल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 67 व्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये नऊ खेळांना स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. या निर्णयाने संबंधित खेळातील खेळाडू आणि संघटना संभ्रमात आहेत.

राज्य शासनाने 46 अनुदानित आणि 42 विनाअनुदानित खेळ प्रकारांच्या स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तर दुसर्‍या बाजूला स्कूल फेडरेशनने अनुदानित खेळ प्रकारातील नऊ खेळांच्या स्पर्धाच रद्द केल्या आहेत. असे असले तरी क्रीडा विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार संबंधित वगळलेल्या नऊ क्रीडा प्रकारांच्या जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत. राज्य स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकाविणार्‍या खेळाडूला 25 तर राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्याला 30 ग्रेस गुण मिळतात.

स्कूल फेडरेशनच्या नऊ क्रीडा प्रकारांबाबत घेतलेल्या निर्णयानुसार संबंधित खेळाडू राष्ट्रीय स्पर्धाच खेळला नाही, तर त्याला ग्रेस गुणांचा फायदा मिळणार नाही. त्याचबरोबर नोकरीमधील 5 टक्के आरक्षणाचा लाभही संबंधित क्रीडा प्रकारातील खेळाडूला मिळू शकणार नाही. स्कूल फेडरेशनच्या या निर्णयाने लाखो खेळाडूंना फटका बसणार असून, राज्याच्या क्रीडा विभागाने यावर पुनर्विचाराची मागणी फेडरेशनकडे करावी, अशी मागणी संबंधित खेळाडू आणि संघटनांनी केली आहे.

हे आहेत वगळलेले नऊ खेळ
स्कूल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील वगळण्यात आलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये रोलबॉल, आट्यापाट्या, बॉल बॅडमिंटन, सिकई-मार्शल आर्ट, थ्रो-बॉल, डॉज-बॉल, टेनिक्वाईट, शुटिंग बॉल आणि कॅरम या खेळांचा समावेश आहे. वास्तविक स्कूल फेडरेशन ऑफ इंडियाने नऊ खेळ वगळणे ही मोठी गोष्ट आहे. अशावेळी राज्याच्या क्रीडा विभागाने या नऊ खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धा होण्याबाबत प्रयत्न करणे गरजेचे आहे. या स्पर्धा होणारच नसतील तर जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूला काहीही लाभ मिळणार नाही. त्यांच्या ग्रेस गुणांबाबत आणि नोकरी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे.
शिवदत्त ढवळे, सहसचिव, शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ.

स्कूल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने नऊ खेळांच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्या संदर्भात क्रीडा विभाग म्हणून कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करणार नसले, तरी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धांचे नियोजन मात्र करणार आहोत. खेळाडूंना त्यानिमित्ताने मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
                        -सुहास दिवसे, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय 

हेही वाचा :

Good News !! टोमॅटोची लाली उतरली

HBD Randeep Hooda : गाड्या धुतल्या, रेस्टॉरंटमध्ये काम केलं, रणदीपने कसं मिळवलं इतकं यश

Back to top button