..आता पुणे शहर असुरक्षित वाटते : विजय वडेट्टीवार

..आता पुणे शहर असुरक्षित वाटते : विजय वडेट्टीवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्याची ओळख निवृत्तांचे शहर म्हणून पूर्वी होती. अनेक विद्वान माणसे या शहराने दिली. अनेक जण सुखीसमाधानाने राहायचे, निवृत्तीनंतर अनेक अधिकारी आवर्जून पुण्यात कायमचे राहायला यायचे. मात्र, आता पुण्याची ओळख बदलत चालली आहे. पूर्वी मुंबई असुरक्षित वाटत होती, आता पुणे असुरक्षित वाटायला लागले आहे, असे परखड मत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी व्यक्त केले. पुणे बचाव समितीतर्फे 'असुरक्षित पुणे कोणामुळे?' या विषयावर पत्रकार भवन येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे, अ‍ॅड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, विनिता देशमुख उपस्थित होते.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, जळगाव घटनेतील आरोपींवर 11 दिवसांनंतर कारवाई करण्यात आली. ती पण पुण्यातील पोर्शे कार अपघात घडल्यानंतर. आरोपींवर कारवाई करायला 11 दिवस का लागतात? हा मोठा प्रश्न आहे. राजकारणी म्हणून घ्यायची मला लाज वाटते. पूर्वी गावाकडे आमदार आले म्हटल्यावर किती इज्जत मिळायची. आता आमदार गेल्यावर लोक म्हणतात, तो बघा चोर आला आहे. सत्तेचा चुकीच्या पध्दतीने गैरवापर होत आहे. याबाबत खरे बोललो, तर आम्ही देशद्रोही, आमच्यावर लगेच कारवाई होते. तसेच, पुण्यातील पोलिस आयुक्तालयात दारूच्या बाटल्या भेटत असतील, तर येथील पोलिसही रात्रीचे झिंगतच असणार आणि झिंगलेले हे नेहमी झिंगलेल्यांचीच मदत करतात. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाबाबत मोठा संशय व्यक्त होतो.

मी गाडी खरेदी केली तेव्हा मी आमदार असून, मला गाडीला नंबर मिळाल्याशिवाय गाडी दिली नाही आणि पोर्शे अपघात प्रकरणातील गाडी विनानंबरची कशी काय धावत होती? असा प्रश पडतो. तसेच, सेवाज्येष्ठतेनुसार बदलीसाठी काढलेल्या 16 जणांच्या यादीतील 15 जणांचीच बदली होते. त्या यादीतून डॉ. तावेरेंना कसे काय वगळले? डॉ. तावरे दहा वर्षे एकाच ठिकाणी आहे. त्याची बदली का बरे झाली नाही? अ‍ॅड. सरोदे म्हणाले, पोलिसांनी पोर्शे अपघात प्रकरणाची केस कुमकुवत करण्याचा प्रयत्न केला.

अल्पवयीन मुलांना दारू दिली, याचा वेगळा अन् अपघात प्रकरणाचा वेगळा एफआयआर केला आहे. असो, मात्र या केसमुळे पोलिस आणि प्रशासनातील अधिकार्‍यांचे गौडबंगाल, बेकायदेशीर कामे बाहेर निघाली आहेत. बाल न्यायालयामध्ये मी काम केले आहे, तिथे भोंगळ कारभार सुरू आहे. विश्वंभर चौधरी म्हणाले की, लोकशाही ही एकदा मतदान करण्याची गोष्ट राहिली नाही. तिला दररोज हाताला धरून पुढे ढकलण्याची गरज निर्माण झाली आहे. माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे मीडिया पुन्हा जिवंत झाला आहे, असे वाटते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news