वाहतूक कोंडीचे खापर महापालिकेवर; पोलिसांनी दिली अजित पवारांकडे यादी

वाहतूक कोंडीचे खापर महापालिकेवर; पोलिसांनी दिली अजित पवारांकडे यादी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाहतूक कोंडीचे खापर पोलिसांनी महापालिकेवर फोडले आहे. प्रमुख रस्त्यांवरील अडथळ्यांची यादीच पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केली असून, ही कोंडी सोडविण्यासाठी पालिकेने नक्की काय उपाययोजना कराव्यात हे त्यात दिले आहे. त्यानंतर महापालिका आयुक्तांसह विभागीय आयुक्त, वाहतूक पोलिसांच्या यंत्रणेने बुधवारी शहरातील दिवसभर रस्त्यांची पाहणी करून उपाययोजनांचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाबाबत चर्चा झाली. या वेळी वाहतूक पोलिसांनी थेट दहा रस्त्यांची यादीच उपमुख्यमंत्र्यांपुढे मांडली.

आयत्यावेळी पोलिसांकडून ही यादी पुढे आणण्यात आल्याने पालिकेचे अधिकारीही गडबडले. विशेष म्हणजे या यादीत नक्की कशामुळे वाहतूक कोंडी होते आणि त्यावर पालिका प्रशासनाकडून कशा पध्दतीने काहीच उपाययोजना होत नाहीत, हे स्पष्ट करण्यात आले होते. त्याबाबत पालिकेच्या अधिकार्‍यांना मात्र काहीच उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे ही बैठक संपताच विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि वाहतूक पोलिस उपायुक्त यांनी एकत्रित या सर्व रस्त्यांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी सुरू झालेली ही पाहणी रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती. या पाहणीनंतर कोंडी फोडण्यासाठी कोणत्या विभागाने काय उपाययोजना करायच्या याबाबत आज गुरुवारी पुन्हा या सर्व विभागांची एकत्रित बैठक बोलाविण्यात आली असल्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

या दहा रस्त्यांची पहाणी

  • गंगाधाम ते लुल्लानगर चौक
  • नॉर्थ मेन रस्ता कोरेगाव पार्क
  • पुणे-बंगळुरू महामार्ग
  • बाणेर-सूस रस्ता
  • गणेशखिंड रस्ता
  • सोलापूर रस्ता (पीएमपी डेपो)
  • पुणे-नगर रस्ता (वाघोली)
  • कात्रज- मंतरवाडी रस्ता
  • जुना मुंबई-पुणे महामार्ग
  • थेऊरफाटा-लोणीकंद रस्ता

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news