जिल्हाधिकार्‍यांचा आळंदीत पाहणी दौरा; सोयीसुविधांचा घेतला आढावा

जिल्हाधिकार्‍यांचा आळंदीत पाहणी दौरा; सोयीसुविधांचा घेतला आढावा

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ व प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत आळंदीत पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी येथील दर्शनबारी जागा, भक्ती सोपान पूल, स्कायवॉक, नदीपात्रातील जलपर्णी, प्रदक्षिणा मार्ग यांची पाहणी करून सर्व प्रशासकीय यंत्रणांना योग्य ते निर्देश दिल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

या पाहणीदरम्यान मंदिर समिती विश्वस्त तथा पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, माजी सभापती डी. डी. भोसले पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे विविध मागण्या केल्या. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी दरवर्षीप्रमाणे दर्शनबारीची जागा वारी कालावधीत प्रशासनाच्या ताब्यात घेण्याचे आदेश लवकरात लवकर निर्गमित करण्याच्या सूचना हवेली प्रांताधिकार्‍यांना केल्या. तसेच भक्ती सोपान पुलाची डागडुजी करण्यासाठी आवश्यक निधी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या. त्याचप्रमाणे इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहकार्य घेतले जाईल तसेच येत्या काळात जलपर्णी नियमितपणे काढण्यासाठी आळंदी नगरपरिषदेस जेसीबी, पोकलेन मशिन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सांगितले.

या पाहणी दौर्‍यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, हवेलीचे प्रांत संजय आसवले, आळंदीचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे, आळंदी वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, आळंदी देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व आळंदी नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

भाविकांच्या सुविधांसाठी समन्वयाने काम करा

'सुरक्षित वारी, हरित वारी' या संकल्पनेवर आधारित या वर्षीची वारी असावी आणि वारीसाठी राज्यभरातून येणार्‍या भाविकांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपापसांत समन्वय ठेवून कामकाज करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी उपस्थित सर्व अधिकार्‍यांना दिल्या.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news