अपहरण करून मागितली एक कोटीची खंडणी

अपहरण करून मागितली एक कोटीची खंडणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमधून जास्त फायदा करून देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. काही दिवस त्याचा मोबदलादेखील दिला. मात्र, पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीचे अपहरण करून जिवे ठार मारण्याची धमकी देत एक कोटीची खंडणी मागण्यात आली.

कदमवाक वस्ती येथील मनाली रिसॉर्टमधून एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांकडून सात जणांवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याबाबत पुनावळे पिंपरी- चिंचवडमधील 34 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमित रोकडे, दयानंद रोकडे (दोघेही रा. अहमदपूर, लातूर), अमोल क्षीरसागर (रा. पर्वती) व चार अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 21 मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला आहे.

गुंतवणुकीचे पैसे परत मागितल्याचा आला राग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खासगी कंपनीत नोकरी करतात. एका मित्राच्या माध्यमातून त्यांचा अमित रोकडे याच्यासोबत परिचय झाला होता. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादीने पैसे गुंतवले. आरोपींनी सुरुवातीला परतावा मिळवून दिला. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे नातेवाईक, मित्र यांच्याकडून सहा कोटी पन्नास लाख रुपये जमा करून आरोपींना दिले. मात्र, त्यानंतर आरोपींनी कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही. त्यामुळे फिर्यादींनी आरोपींकडे पैशांसाठी तगादा लावला होता. याचा राग आल्याने आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला कदमवाक वस्ती येथील मनाली रिसॉर्टमध्ये बोलवून घेतले. त्यांचे एका कारमधून आलेल्या अनोळखी चार व्यक्तींनी जबरदस्तीने अपहरण केले.

लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढे फिर्यादी यांना पुणे- सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने नेले. त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, फिर्यादी यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर अनोळखी चार जणांनी त्यांना सोडून दिले. पंढरपूरपर्यंत फिर्यादींना आरोपी घेऊन गेले होते. अहमदपूरला पोहोचविण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे अपहरणकर्त्यांनी फिर्यादीला सांगितले. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके करत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news