आरटीओच्या ‘सारथी’चा असहकार; कच्च्या- पक्क्या लायसन्स कामाचा उडाला बोजवारा

आरटीओच्या ‘सारथी’चा असहकार; कच्च्या- पक्क्या लायसन्स कामाचा उडाला बोजवारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाहन परवान्यासह अन्य कागदपत्रांच्या कामासाठी आवश्यक असलेली 'सारथी' प्रणाली गुरुवारी (दि.16) सकाळपासून अचानक ठप्प झाली. त्यामुळे कार्यालयातील कच्च्या- पक्क्या लायसन्ससह अन्य कामे थांबली. परिणामी, वाहनचालकांना हेलपाटे सहन करावे लागले, त्यासोबतच कामे रखडल्याने मनस्तापाचा सामना करावा लागला.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कागदपत्रांची कामे आता ऑनलाइन पद्धतीने केली जात आहेत. त्यासाठी परिवहन विभाग 'वाहन आणि सारथी' प्रणालीचा वापर करते. गुरुवारी या दोन प्रणालींपैकी एक असलेली 'सारथी' प्रणाली तांत्रिक समस्येमुळे बंद पडली. त्यामुळे पुणे आरटीओ कार्यालयात कागदपत्रांच्या कामासाठी आलेल्या वाहनचालकांना हेलपाटे सहन करावे लागले. सकाळी असलेल्या नियोजित अपॉईंटमेंट अचानक रद्द झाल्यामुळे शिकाऊ परवाना (लायसन्स) घेण्यासाठी आलेल्या वाहनचालकांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. 'सारथी' प्रणालीवरील वाहन परवाना नूतनीकरण, पक्का परवाना, शिकाऊ परवाना, आंतरराष्ट्रीय परवाना यांच्यासह अनेक कामे गुरुवारी रखडली. ही प्रणाली येत्या शनिवार (दि.18)पर्यंत बंद राहणार आहे, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

तसदीबद्दल क्षमस्व!

सारथी प्रणालीचे नियोजन एनआयसीमार्फत केले जाते. अचानक तांत्रिक समस्या आल्यामुळे संपूर्ण राज्यातील आरटीओ कार्यालयामध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, राज्यातील सर्वच ठिकाणी असलेली वाहन परवान्यासंदर्भातील सर्व कामे ठप्प झाली आहेत. संगणकावर ही प्रणाली उघडण्याचा प्रयत्न केला असता, प्रणालीच्या मेंटनन्सचे काम सुरू असून, पुढील तीन दिवस ही प्रणाली बंद राहणार आहे. आपल्याला होणार्‍या तसदीबद्दल दिलगीर आहोत, असा मेसेज समोर येत आहे. यामुळे ही प्रणाली सुरू होऊन वाहनचालकांची कामे पुन्हा सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

'सारथी' प्रणालीची तांत्रिक कामे सुरू आहेत. येत्या शनिवारी (दि.18) सकाळी 10 पर्यंत ही प्रणाली बंद राहणार आहे. ज्या नागरिकांनी प्रणाली बंद असलेल्या कालावधीत अपॉईंटमेंट घेतलेल्या आहेत. त्यांची कामे पुढील आठवड्यात पुणे आरटीओ कार्यालयात केली जातील.

– संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news