

परिंचे: निरा नदीवरील धरणसाखळीत 97.71 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, पुरंदरसह बारामती, इंदापूर, खंडाळा, फलटण आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या तसेच पिण्याच्या पाण्याच्या गरजा यंदा सहज भागणार आहेत. भाटघर, निरा-देवघर, वीर आणि गुंजवणी या चारही धरणांची एकूण क्षमता 49 टीएमसी असून, सध्या त्यामध्ये 47.224 टीएमसी पाणी उपलब्ध आहे.
यावर्षी पावसाळ्यात भाटघर, निरा-देवघर आणि वीर ही धरणे 100 टक्के भरल्याने मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा लक्षणीयरीत्या चांगला आहे. निरा खोऱ्यातील मुबलक पाणीसाठ्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तसेच गहू, हरभरा, टोमॅटो, कांदा आदी पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. काढणी झाल्यानंतर चारापिके-कडवळ, मका, घास आदी घेणे शक्य होणार असल्याने जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्नही सोडविला जाणार आहे.
धरण क्षेत्रात यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने पुढच्या पावसाळ्यात जुलैपर्यंत पाऊस कमी झाला, तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे धरण प्रशासनातील कर्मचारी संभाजी शेडगे यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याचीही खात्री
वीर धरणातून सासवड नगरपालिकेला, तर मांडकी डोहातून जेजुरी नगरपालिका व औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. निरा नदी व डावा कालवा यांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सहकारी उपसा सिंचन योजनांद्वारे पाणीपुरवठा सुरळीत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या आधारावर फळबागा घेतल्या असून, यंदा त्यांना पाण्याची तूट भासणार नाही.
कालव्यांतून पाण्याचा विसर्ग वाढणार
वीर धरणातून निरा डावा कालव्यात 676 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर उजवा कालवा दुरुस्तीमुळे बंद असला, तरी आगामी एक ते दोन दिवसांत 500 क्युसेकने विसर्ग सुरू होईल. त्यामुळे नदीकाठच्या आणि कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार असल्याचे शाखा अभियंता स्वरूपा माळी यांनी सांगितले.