

निमोणे: पुणे-नगर रस्त्यालगतच्या परिसरात एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थाच्या विळख्यात तरुणाई अडकत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. पोलिसांकडून वारंवार कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करून आरोपींना अटक केली जात असली, तरी काही दिवसांतच नव्या मार्गांनी हा काळा व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याचे दिसून येते. या साखळीमागील सूत्रधार आणि प्रत्यक्ष सेवन करणारे अनेक जण अद्यापही उघडकीस न येणे, ही गंभीर बाब ठरत आहे.
ड्रग्जच्या आहारी गेलेले तरुण काही काळ समाजापासून लपतात; मात्र त्यांच्या कुटुंबीयांना वास्तव ठाऊक असते. तरीही ‘लोक काय म्हणतील?’ या भीतीने अनेक पालक हा प्रश्न चार भिंतीतच दडपून ठेवतात. परिणामी, समस्या अधिकच बिकट होत जाते.
अलीकडील कारवाईत अटक झालेल्या आरोपींपैकी अनेक जण सधन कुटुंबांतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला केवळ सेवन करणारे हे तरुण पुढे व्यसनाधीन होतात. घरातून विरोध वाढल्यानंतर काही जण चोरीकडे वळतात आणि अखेरीस ड्रग्जच्या विक्रीतही सहभागी होतात.
वाघोली ते शिरूर पट्ट्यात दर आठवड्याला कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज विकले जात असल्याची चर्चा असून, अल्पवयीन व 20 ते 25 वयोगटातील तरुण यामध्ये मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. मुलांच्या वागण्यात होणारे बदल पालकांच्या लक्षात येत असूनही बदनामीच्या भीतीने ते दुर्लक्ष करतात.
ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या मुलांना वाचविण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. संशयास्पद बदल दिसल्यास वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार करणे आणि गरज पडल्यास पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. नशेच्या साखळीला आळा घालण्यासाठी कुटुंबांनी निर्भयपणे पुढे येणे ही काळाची गरज आहे.