

वाल्हे: आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीहून पंढरपूरकडे 8 जुलै रोजी प्रस्थान होत आहे. दिवे घाट ते निरा या 50 किलोमीटर पालखी मार्गावरील चौपदरीकरण काम जवळपास पूर्णत्वास गेले आहे.
यामध्ये परिसरातील अनेक मोठ्या झाडांची कत्तल झाल्यामुळे यंदाही वारकऱ्यांना रखरखत्या उन्हातून पायीवारी करावी लागणार आहे. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पायी पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातून दि. 11 ते 15 जुलै या पाच दिवसांत मार्गस्थ होणार आहे.
पुरंदर तालुक्यातील पालखी मार्गावर पूर्वी जुनी व मोठी सावलीची झाडे होती. झाडांच्या मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या सावलीत वारकरी थोड्याफार विसावा घेत होते; मात्र मागील तीन-चार वर्षापासून पालखी मार्गाचे रुंदीकरण सुरू झाल्याने मार्गावरील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे पालखी मार्गावर सध्या सावलीच राहिलेली नाही. पायी चालताना थोडा वेळ उसंती घ्यायची असल्यास सावली शोधून सापडणार नाही. वारकऱ्यांना पूर्णपणे उन्हात तापलेल्या मार्गावर पायी चालावे लागणार आहे.
जेजुरी औद्योगिक वसाहत ते पिसुर्टी फाटा यादरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. या मार्गावर 100 वर्षांपूर्वीची जुनी झाडे होती. दौंडज खिंड ते पिसुर्टी कमानीपर्यंत पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील तीन-चार वर्षांपासून अद्याप सुरूच होते. या मार्गाचे रुंदीकरण करताना जुन्या रस्त्याच्या कडेची सर्वच्या सर्व झाडे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे पालखी मार्ग रुंद झाला असला, तरी किमान 10 वर्ष तरी या पालखी मार्गावर सावलीची झाडे येणे अशक्य असल्याचे वृक्षप्रेमी बोलत आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरीच्या मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी वाल्हेकडे मार्गस्थ होताना दौंडज खिंडीत सकाळच्या न्याहरीसाठी विसावतो. या परिसरातील जुने वटवृक्ष, पिंपळासह अगदी छोटी बोराची झाडे देखील काढल्याने विसावा स्थळ भकास झाला आहे. सद्यःस्थितीत या परिसरातील पालखी महामार्गालगत काही झाडे लावली असली तरी या झाडांचे संगोपन योग्य पद्धतीने केले जात नसल्याने यातील अनेक झाडे वाळून गेली आहेत.