बारामतीत गट-गणांची पुनर्रचना राष्ट्रवादीच्या पथ्यावर

बारामतीत गट-गणांची पुनर्रचना राष्ट्रवादीच्या पथ्यावर
Published on: 
Updated on: 

राजेंद्र गलांडे

बारामती : आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी बारामती तालुक्यात एका गटाची तर दोन गणांची वाढ झाल्याने तुलनेने यंदा इच्छुकांची संख्या वाढणार आहे. सत्तेतील राष्ट्रवादीपुढे विरोधी पक्षांचे फार मोठे आव्हान नाही, परंतु गत निवडणुकीत तालुक्यातील तीन गटांमध्ये विरोधकांनी राष्ट्रवादीला घाम फोडला होता. यंदा गट-गणाच्या पुनर्रचनेत राष्ट्रवादीसाठी सोयीचे गट-गण तयार झाले असल्याने विरोधकांसाठी ही निवडणूक तितकीशी सोपी उरलेली नाही.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १०० टक्के यश

गत निवडणुकीत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या सर्व सहा व पंचायत समितीच्या बारा जागा जिंकत विरोधकांना संधी ठेवलेली नव्हती. बारामती तालुक्यात यापूर्वी अस्तित्वात असलेल्या माळेगाव-पणदरे गटाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. माळेगाव नगरपंचायत झाल्याने हा गट फुटला आहे. आता गुणवडी-पणदरे असा नवीन गट तयार झाला आहे. या गटाच्या पुनर्रचनेबरोबरच अन्य गटांचीही मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. सुपे-कार्‍हाटी, शिर्सूफळ-काटेवाडी, मोरगाव-मुढाळे, गुणवडी-पणदरे, निंबूत-वाघळवाडी व वडगाव निंबाळकर-सांगवी, निरावागज-डोर्लेवाडी असे गट तयार झाले आहेत. यापूर्वीही 2010 पर्यंत वडगाव-सांगवी गट अस्तित्वात होता. गत निवडणुकीत तो सांगवी-डोर्लेवाडी व वडगाव-मोरगाव असा झाला होता. पूर्वी हा गट अस्तित्वात असताना सांगवीकडे फारसे प्रतिनिधित्व राहिले नव्हते. सातत्याने वडगाव, कोर्‍हाळे या भागातच संधी दिली गेली होती. गत निवडणुकीत गट फुटल्यावर सांगवीला संधी मिळाली. यंदा पुन्हा हा गट एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादीच्या इच्छुकांची मोठी गर्दी या गटात असेल.

गत पंचवार्षिक निवडणुकीत सुपे-मेडद गटात भाजपने मोठी ताकद लावली होती. अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीने व्यूहरचना करत निवडणूक जिंकली. परंतु विरोधकांनी दिलेले आव्हान जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले होते. याशिवाय सांगवी-डोर्लेवाडी व माळेगाव-पणदरे गटातही राष्ट्रवादीला अधिकचा घाम गाळावा लागला होता. यंदा पुनर्रचनेत विरोधकांना फारशी संधी राहणार नाही, अशी व्यवस्था केली गेली असल्याचे दिसून येते. तरीही सर्वच इच्छुकांना सामावून घेता येणार नसल्याने नाराजांमुळे राष्ट्रवादीला काही ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. गत निवडणुकीत अनेक मातब्बरांनी पक्षाला थेट आव्हान देत अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी मारली होती. पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, परंतु ती केवळ दिखावू स्वरूपाची ठरली. त्यामुळे पक्षाला आव्हान दिले तरी फार काही बिघडत नाही, अशी अनेकांची मानसिकता झाली आहे.

पाण्यासाठी राष्ट्रवादीने आणला निधी

यंदाच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठा निधी आणला आहे. माळेगाव व त्यानंतर सोमेश्वर कारखाना एकहाती जिंकला आहे. त्यात पश्चिम भागात शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे हे अजित पवार यांच्यासोबत आले आहेत. त्यामुळे पश्चिम भागात राष्ट्रवादीच्या विरोधकांची ताकद घटली आहे. राज्यात सत्तेत सहभागी झाल्यावर तालुक्यात शिवसेना वाढीसाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. एकेकाळी जनआंदोलनामुळे शिवसेनेने चांगली ताकद निर्माण केली होती. काँग्रेसची फारशी ताकद तालुक्यात नाही. ते नेहमीच राष्ट्रवादीशी जुळवून घेत आले आहेत. त्या बदल्यात समित्यांवर संधीच्या पलीकडे काँग्रेसला काही मिळालेले नाही. भाजप हाच राष्ट्रवादीचा येथे विरोधक आहे. यंदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असाच सामना रंगेल, अशी
स्थिती आहे.

ओबीसींसाठी कसरत

बारामती तालुक्यात ओबीसींची संख्या मोठी आहे. यंदा त्यांचे आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे सर्वसाधारण जागेवर त्यांना संधी द्यावी लागणार आहे. ओबीसींना जागा सोडल्या तर सर्वसाधारण गटातील इच्छुक नाराज होतील, पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नाही तर ओबीसींच्या नाराजीचा फटका बसेल, अशी अडचणीची स्थिती तिकीट वाटपावेळी सर्वच पक्षांपुढे असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news