प्रसाद जगताप
पुणे : नियमानुसार रिक्षामालकाने पांढर्या रंगाचे शर्ट-पँट आणि चालकाने खाकी रंगाचे शर्ट-पँट परिधान करणे बंधनकारक आहे. मात्र, नवीन रिक्षाचालक कधी शर्ट, तर कधी पँट वेगवेगळ्या रंगांचे परिधान करून युनिफॉर्मच्या नियमांची ऐशीतैशी करीत आहेत. याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) दुर्लक्ष होत आहे.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार आणि रिक्षा ही सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवेत मोडत असल्यामुळे रिक्षाचालकांनी युनिफॉर्म परिधान करणे, हे बंधनकारक आहे. मात्र, नवीन रिक्षाचालक युनिफॉर्मच परिधान करीत नाहीत. अनुचित प्रकार रोखण्यासाठी शहरात रिक्षाचालकांकडून युनिफॉर्म, बॅच-बिल्ला यांची कडक अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रिक्षाचालकांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार युनिफॉर्म घालणे अनिवार्य आहे. त्यांनी प्रवासी वाहतूक करताना बॅच-बिल्ला, पोशाख परिधान करायला हवा. यासंदर्भात आम्ही सातत्याने कारवाई करीत असतो. तपासात युनिफॉर्म परिधान न केल्याचे आढळून आल्यास संबंधित रिक्षाचालक कायद्यातील तरतुदीनुसार दंडास पात्र होऊ शकतात.
– डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणेरिक्षामालक असल्याने मी दररोज पांढरा ड्रेस घालतो. रिक्षासंदर्भातील सर्व सरकारी नियमांचे पालन करतो. इतर नव्या रिक्षाचालकांनीसुध्दा सर्व नियम पाळण्यावर भर द्यायला हवा. आरटीओला सहकार्य करावे.
– अनंता वीर, रिक्षाचालक
…म्हणून युनिफॉर्म आवश्यक
शहरामध्ये वाहतूक करताना अनेक रिक्षाचालक प्रवाशांशी उद्धटपणे वागत आहेत. प्रवाशांना शिवीगाळ करतात. भाडे नाकारतात. अनेकदा प्रवाशांना मारहाण करतात व पसार होतात. या प्रवाशांनी युनिफॉर्म घालून त्यावर आरटीओने दिलेला बॅच खिशाला लावला, तर त्यांची ओळख पटविणे सोपे जाते. गुन्हा केलेल्या रिक्षाचालकावर तत्काळ कारवाई करता येते.
इथे करा तक्रार…
रिक्षाचालकांनी गैरवर्तनासह जादा भाडे आकारणे, भाडे नाकारणे, युनिफॉर्म, यांसारख्या तक्रारी प्रवाशांनी थेट आरटीओच्या rto.12- mh@gov. in या ई-मेल आयडीवर किंवा कार्यालयात अर्जाद्वारे कराव्यात.
हे ही वाचा :