अहमदनगर : केडगावात परप्रांतीय युवकाचा गळा आवळून खून | पुढारी

अहमदनगर : केडगावात परप्रांतीय युवकाचा गळा आवळून खून

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : केडगाव उपनगरामधील रेल्वे उड्डाणपूल ते केडगाव देवी मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर एका वीटभट्टीजवळ युवकाचा कमरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून करण्यात आला. गुरुवारी (दि.29) सकाळी ही घटना उघडकीस आली. मृत युवक नेपाळी असल्याचा संशय पोलिसांना आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके व कोतवाली पोलिसांची दोन पथके तपास करीत आहेत.

अंदाजे 30 ते 32 वर्षे वयाच्या इसमाचा मृतदेह परिसरातील नागरिकांना दिसून आला. कोतवाली पोलिसांना नागरिकांनी माहिती दिली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत युवकाच्या गळ्याला कमरेचा पट्टा व एक कापड गुंडाळलेले होते. त्यामुळे कमरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. खून करून मृतदेह नगरमध्ये आणून टाकल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

मृत तरुण परप्रांतीय असल्याचा, तसेच नगरमध्ये कुठे तरी कामाला असल्याचा अंदाज पोलिसांचा आहे. मात्र, तो नगरमध्ये कामाला होता की इतर कुठे, याचा तपास पोलिस करत आहेत. मृतदेह आढळलेल्या परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तसेच, शहरातील हॉटेल, ढाबे आदी ठिकाणी पोलिस चौकशी करीत आहेत. दरम्यान, सात महिन्यांपूर्वी रेल्वेस्थानक परिसरातील इंगळे वस्तीजवळील पडीक शेतात छत्तीसगडमधील महिलेचा मृतदेह आढळला होता.

हेही वाचा

स्पर्मची अदलाबदल; रुग्णालयाला दंड

राज्यातील 3 जिल्हे काठावर पास ; जूनमध्ये पावसाची सरासरी कमीच

संतोष शिंदे मृत्यू प्रकरण : सपोनि राहुल राऊत निलंबित

Back to top button