

NEET UG 2026 Paper Leak: नीट-यूजी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासातून नवी माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत सुरू असलेल्या चर्चेचा फायदा घेत त्यांना प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप पुण्यातील एका चहाच्या दुकानदारावर आहे. या प्रकरणात दुकानदार शेषराव बजरंग सूर्यवंशी याच्याविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळवून देण्यासाठी तब्बल ४.५ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
शेषराव सूर्यवंशी हा या प्रकरणात अटक करण्यात आलेला १४वा आरोपी आहे. त्याचे नाशिकमध्ये अटक करण्यात आलेल्या करिअर कौन्सिलर शुभम खैरनार याच्याशी संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. सीबीआयने सूर्यवंशीला २ सप्टेंबर रोजी अटक केली होती. चौकशीसाठी तीन दिवसांची कोठडी संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
नीट-यूजी परीक्षेची तयारी करणारे दोन विद्यार्थी एप्रिल महिन्याच्या मध्यात पुण्यातील त्यांच्या कोचिंग क्लासबाहेर असलेल्या चहाच्या दुकानात बसले होते. परीक्षेची तयारी आणि प्रश्नपत्रिकेबाबत ते आपापसात चर्चा करत होते. त्याच वेळी दुकानाचा मालक शेषराव सूर्यवंशी त्यांच्याजवळ आला.
सूर्यवंशीने विद्यार्थ्यांना सांगितले की, त्याच्या एका मित्राकडे परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळवून देण्याची सोय आहे. मात्र, त्यासाठी ४.५ लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितल्याचा आरोप आहे.
यानंतर या दोन्ही विद्यार्थ्यांना २८ एप्रिल रोजी नाशिकमधील पंचक गावातील एका घरात नेण्यात आले. तिथे आधीच आणखी आठ विद्यार्थी उपस्थित होते. अशा प्रकारे एकूण दहा विद्यार्थ्यांना प्रश्न देण्यात आले. या विद्यार्थ्यांनी पुढील तीन ते चार दिवस त्या प्रश्नांचा अभ्यास केल्याची माहिती सीबीआयच्या तपासात समोर आली आहे.
सीबीआयच्या तपासानुसार, पंचक गावातील घरात आणलेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या मूळ कागदपत्रांसह शैक्षणिक प्रमाणपत्रेही घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून पैसे मिळण्याची खात्री करण्यासाठी ही कागदपत्रे स्वतःकडे ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.
नीट-यूजी परीक्षा ३ मे रोजी झाली. त्याआधी २ मे रोजी विद्यार्थ्यांना घरातून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, त्यांना दिलेले प्रश्न परत करण्यास सांगण्यात आले होते.
या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याने मात्र गुपचूप आपल्या मोबाईलमध्ये सर्व प्रश्न स्कॅन करून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे फुटलेल्या प्रश्नांची प्रत त्याच्याकडे राहिली होती.
परीक्षा झाल्यानंतर सूर्यवंशीने एका विद्यार्थ्याशी संपर्क साधला. त्याला आपल्या चहाच्या दुकानावर तीन लाख रुपये रोख आणून देण्यास सांगितल्याचा आरोप आहे.
या विद्यार्थ्याच्या आईने पैशांची व्यवस्था करण्यासाठी ३५.८ ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवले. त्यातून मिळालेले पैसे विद्यार्थ्याने सूर्यवंशीला दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
सूर्यवंशीने आणखी एका विद्यार्थ्याकडेही पैशांची मागणी केली होती. मात्र, त्या विद्यार्थ्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि कोणतीही रक्कम दिली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
सीबीआयने सूर्यवंशीच्या मोबाईलची तपासणी केली असता, ३० एप्रिल रोजी काढलेला एक फोटो आढळला. या फोटोत एक मुलगी फुटलेल्या प्रश्नांची प्रत हातात धरून उभी असल्याचे दिसले.
या फोटोसह इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआयने विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न कसे पोहोचले, त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था कोणी केली आणि या संपूर्ण प्रकारात कोणाचा सहभाग होता, याचा तपास केला.
या प्रकरणात नाशिकमधील करिअर कौन्सिलर शुभम खैरनार याचीही महत्त्वाची भूमिका असल्याचा आरोप आहे. त्याने विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था कशी केली, याची माहिती तपासातून समोर आली आहे.
सीबीआयच्या माहितीनुसार, शुभम खैरनारची २०१८ मध्ये नांदेडमधील शैक्षणिक सल्लागार संस्था चालवणाऱ्या नागेश नानाराव धांडे याच्याशी ओळख झाली होती.
या वर्षी एप्रिलच्या मध्यात खैरनारने धांडे याच्याशी संपर्क साधला. अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी काही विद्यार्थ्यांना पाठवायचे असल्याचे त्याने सांगितले. या विद्यार्थ्यांच्या राहण्याची किमान चार दिवस व्यवस्था करण्याची विनंतीही त्याने केली. त्यासाठी ७५ हजार रुपये देण्याची तयारी खैरनारने दर्शवली होती.
याच चर्चेदरम्यान खैरनारने आपल्याकडे नीट-यूजी २०२६ चा 'गेस पेपर' म्हणजे संभाव्य प्रश्नपत्रिका असल्याचे धांडेला सांगितले.
यानंतर धांडेने आपल्या एका मित्राशी संपर्क साधला. हा मित्र पंचक गावात किराणा दुकान चालवत होता. त्याच्याकडे तळमजल्यावर एक जागा रिकामी होती. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी ही जागा उपलब्ध करून देण्याचे ठरले. धांडे याने त्यासाठी १५ हजार रुपये आगाऊ दिले आणि किराणा दुकानदाराला खैरनारचा मोबाईल क्रमांक दिला.
तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. खैरनारने धांडेला अनेक पीडीएफ फाइल पाठवल्या होत्या. या फाइलमधील प्रश्नांच्या प्रती काढून घेण्यास त्याने सांगितले होते.
या फाइलमध्ये जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचे ५५० हून अधिक प्रश्न होते. धांडे याने एका झेरॉक्स दुकानातून या प्रश्नांचे आठ संच छापून घेतले.
यानंतर विद्यार्थ्यांसमोर स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगून त्यांना प्रश्न देण्यात आल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी धांडे याला भौतिकशास्त्राच्या प्रश्नांची पीडीएफ फाइल मिळाली. त्यानंतर त्याने पुन्हा त्याच पद्धतीने प्रश्नपत्रिकांच्या प्रती तयार केल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे.
नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांना प्रश्न उपलब्ध करून देणे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे आणि त्यांच्याकडून पैसे घेणे, अशा विविध बाबींचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणात शेषराव सूर्यवंशीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, त्याचे शुभम खैरनार आणि इतर संबंधित व्यक्तींशी असलेले संबंध तपासले जात आहेत.