Tiger Shroff | अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार; लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने सलमान खानसोबत काम करणाऱ्यांना धमकी

ऑडिओ क्‍लिप व्‍हायरल
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्‍या कारवर गोळीबार झाल्‍यानंतर घटनास्‍थळी तपासणी करताना फॉरेन्‍सिक विभागाचे कर्मचारी.
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्‍या कारवर गोळीबार झाल्‍यानंतर घटनास्‍थळी तपासणी करताना फॉरेन्‍सिक विभागाचे कर्मचारी.
Published on: 
Updated on: 

मुंबई : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास जुहू येथील पुष्पा नरसी पार्कजवळ गोळीबार करण्यात आला. फुटबॉल खेळून परतत असताना टायगरच्या गाडीला लक्ष्य करण्यात आले. या घटनेत टायगर सुरक्षित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, त्याचा चालक आणि परिसरातील एका रिक्षाचालकाला दुखापत झाली. दोघांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एका संशयिताला सांताक्रूझ परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीशी अनिल पंडित नावाच्या व्यक्तीने घेत सोशल मीडियावर ऑडिओ क्‍लिप प्रसारित झाली आहे. त्यातून ऑडिओ क्लिपमधून सलमान खानसोबत काम करणाऱ्या चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. मात्र, या संदेशाची सत्यता आणि हल्लेखोरांचा टोळीशी असलेला संबंध पोलिसांकडून स्वतंत्रपणे पडताळला जात आहे.

सोशल मीडियावरील संदेशात नेमके काय?

सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल पंडित नावाने बोलणाऱ्या व्यक्तीने लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या वतीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला. टायगर श्रॉफला यापूर्वी इशारा दिला होता. मात्र त्याने तो गांभीर्याने घेतला नाही, असा दावा या संदेशात करण्यात आला.

सलमान खानसोबत काम करणाऱ्या चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना लक्ष्य करण्याची धमकीही या क्लिपमध्ये देण्यात आली. सलमान खानने लॉरेन्स बिष्णोई आणि बिष्णोई समाजाची माफी मागावी; अन्यथा त्याच्या कुटुंबालाही लक्ष्य केले जाईल, अशी धमकी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे निर्देश

या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली आणि तपासाबाबत निर्देश दिले आहे. तसेच, फडणवीस यांनी टायगर श्रॉफला फोन करून आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत, असे सांगत आश्वस्त केले. मंत्री आशिष शेलार यांनीही पोलिस आयुक्तांशी चर्चा केल्याचे सांगितले.

सुरक्षेशी तडजोड नाही : एकनाथ शिंदे

नागपूर : मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस येऊ देणार नाही, असा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दिला. सेलिब्रिटी असो किंवा सामान्य नागरिक, प्रत्येकाची सुरक्षा ही सरकार आणि पोलिसांची जबाबदारी आहे, असे सांगत मुंबईत दादागिरी, दहशत किंवा कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, टायगर श्रॉफवरील गोळीबाराची घटना चिंताजनक आणि निंदनीय आहे.

रिव्‍हाॅल्‍व्‍हर जॅम झाल्याने टायगर बचावला

मुंबई : जुहूच्‍या मैदानात फुटबॉल सामना खेळून टायगर श्रॉफची गाडी बाहेर पडताच मैदानाच्‍या गेटजवळच हल्लेखोरांनी केवळ २० फुटांच्या अंतरावरून पाच गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली असून, एका हल्लेखोराची रिव्‍हॉल्‍व्‍हर ऐनवेळी जॅम झाल्यामुळे टायगर थोडक्यात बचावला. टायगर श्रॉफ जुहू परिसरातील एका मैदानात फुटबॉल खेळून आपल्या कारने गेटमधून बाहेर पडत होता. त्याच वेळी तीन जण मोटरसायकलवरून आले. त्यापैकी दोघांनी कारच्या अगदी समोरून थेट गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी जवळपास ५ राऊंड फायर केले. एका हल्लेखोराची रिव्‍हॉल्‍व्‍हर ऐनवेळी अडकली. ज्यामुळे टायगर श्रॉफचा जीव वाचला. गोळी मारण्याचा त्याने दोन वेळा प्रयत्न केला. परंतु रिव्‍हॉल्‍व्‍हर चालत नसल्याचे पाहून तो दुचाकीवर बसला. तिघेही हल्लेखोर काही क्षणात तिथून पसार झाले. लाइव्ह व्हिडीओमध्ये हल्लेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत असून त्यांच्या तोंडावर कोणताही मास्क किंवा रूमाल नव्हता. गोळीबार करणारे हे तरुण अंदाजे २० ते २२ वयोगटातील असावेत, असा अंदाज पोलिसांना वर्तवला.

गाडीचा दरवाजा उघडण्‍याचा प्रयत्‍न

हल्लेखोरांनी गाडीच्या अगदी जवळ जाऊन समोरून आणि बाजूने गोळीबार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. समोर आलेल्या व्हिडीओनुसार, हल्लेखोरांनी बीएमडब्ल्यू गाडीचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. प्रत्यक्षदर्शींनी चित्रित केलेल्या व्हिडीओमध्ये गोळीबाराचा आवाज आणि घाबरून पळणारी गर्दी दिसत आहे. अवघ्या पाच सेकंदांत पाच गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र, व्हिडीओची स्वतंत्र पडताळणी झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news