

Neet Paper Leak Update: आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याला नीटचा पेपर देणाऱ्या डॉक्टरला अटक झाली आहे. सीबीआय तपासात यानंतर धक्कादायक आणि महत्वाची माहिती समोर येत आहे. सीबीआय तपासात समोर आलेल्या माहितीनुसार डॉक्टर मनोज शिरूरे याने शिवराज मोटेगावकरला पेपर दिला होता. डॉक्टर शिरूरे यांनी मोटेगावकरच्या मुलासाठी हा पेपर दिला असल्याची माहिती समोर येत आहे. मोटेगारवकरचा मुलगा आणि इतर दोन विद्यार्थी अशा एकूण तीन विद्यार्थ्यांना नीटचा फोडलेला पेपर देण्यात आला होता.
आरोपी प्रल्हाद कुलकर्णी याच्याकडून केमेस्ट्री विषयाचा पेपर डॉ. शिरूरे यांनी घेऊन दिला होता. आता सीबीआय इतर दोन विद्यार्थी कोण याचा कसून तपास करत आहेत. सीबीआयने दोन आरोपीना अटक केल्याचे देखील सांगण्यात आलं आहे. यातील पहिला आरोपी हा डॉक्टर मनोज शिरूरे असून त्याला लातूरमधून अटक करण्यात आली. दुसरा आरोपी तेजस शहा असून तो पुण्यातील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अॅकॅडमी या कोचिंग सेंटरमध्ये फिजिक्सचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तेजस शाह याने नीट परीक्षेचा फुटलेले फिजिक्सचे प्रश्न हे मनीषा हवालदार हिच्याकडून मिळवले होते. या प्रकरणी आता एकूण १३ आरोपींन अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील एक महिला प्राध्यापक देखील सीबीआयच्या रडारवर आहे. महिला प्राध्यापक NTA कडील समितीत केमिस्ट्री विषय तज्ञ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या महिलेने केमिस्ट्रीचे प्रश्न मनिषा मांढरेंसोबत शेअर केले होते. मनिषा मांढरे यांना यापूर्वीच सीबीआयने अटक केली आहे. सध्या ती सीबीआय कोठडीत आहे. दरम्यान, पुण्यातील या महिला प्राध्यापकाला सीबीआयकडून अटक केली जाण्याची शक्यता आहे.