

पुणे: नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती हळूहळू वाढत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्याकडून लीक झालेली प्रश्नपत्रिका आपल्या मुलासाठी खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या संशयाच्या आधारे त्यांची सखोल चौकशी करण्यात आली.
सीबीआयने डॉ. शिरुरे यांना चौकशीसाठी लातूरहून पुण्यात आणले होते. त्यांच्याकडे पेपरफुटीच्या अनुषंगाने कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिरुरे यांना अटक करण्यात आली की नाही, याबाबत मात्र अधिकृत दुजोरा अद्यापपर्यंत मिळालेला नाही.
सीबीआयच्या माहितीनुसार, लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या नेटवर्कशी संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा तपास सुरू आहे. रविवारी लातूरमध्ये दाखल झालेल्या सीबीआय अधिकाऱ्यांनी जुन्या औसा रोडवरील सिद्धिविनायक बाल रुग्णालयात जाऊन डॉ. शिरुरे यांची जवळपास साडेचार तास चौकशी केली होती.
चौकशीदरम्यान सीबीआयने काही कागदपत्रे, मोबाईल फोन आणि अन्य डिजिटल साहित्य जप्त केले. प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे यांचा मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर तसेच पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संपर्क असल्याचे समोर आले आहे. सीबीआय आता लीक प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात किती रक्कम घेण्यात आली, किती विद्यार्थी आणि पालकांपर्यंत प्रश्न पोहोचले, तसेच या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता, याचाही तपास करत आहे.
समोरासमोर बसवून होणार चौकशी
नीट पेपरफुटी प्रकरणात पहिल्यांदा अटक करण्यात आलेला नाशिकचा शुभम खैरनार याच्यासह प्रा. मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे या तिघांना समोरासमोर बसवून सीबीआय त्यांच्याकडे चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नीट पेपर लीकचा कथित कट कसा रचला गेला?
सीबीआय तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नीट पेपर फुटीची संपूर्ण योजना अत्यंत नियोजनपूर्वक तयार करण्यात आली होती. मोटेगावकर यांनी आपल्या कोचिंग संस्थेशी संबंधित पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांना राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए)च्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलपर्यंत मार्ग तयार करून दिला.
प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान संबंधित प्रश्न लक्षात ठेवण्यात आले. त्यानंतर हे प्रश्न हाताने लिहून शिवराज मोटेगावकर याच्या मार्फत पोहोचवण्यात आले. पुढे या प्रश्नांना डिजिटल स्वरूप देऊन मोबाईलमध्ये पीडीएफ फाईल तयार करण्यात आली आणि ती कथितपणे आर्थिक व्यवहारातून विकली जात होती. 3 मे रोजी परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकर यांनी मोबाईलमधील फाईल्स डिलीट करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीबीआयच्या तांत्रिकविश्लेषण पथकाने तो डेटा परत मिळविला.