

Shivraj Motegaonkar RCC Classes Pune Sealed: नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाल्यानंतर आता शिवराज मोटेगावकर यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) कारवाईनंतर आता पुणे महानगरपालिकेनेही मोटेगावकर यांच्या मालमत्तांवर धडक कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध RCC क्लासेसशी संबंधित मालमत्ता सील करण्यात आली असून, अनधिकृत बांधकामावरही पालिका कारवाई करणार आहे.
पुण्यातील जे. एम. रोडवरील बोरावके बिल्डिंगमध्ये असलेल्या RCC क्लासेसच्या कॅम्पसवर बुधवारी सकाळपासूनच महापालिकेचं पथक दाखल झालं. या ठिकाणी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी NEET आणि JEE चे क्लासेस घेतले जात होते. मात्र, थकीत मालमत्ता कर आणि नियमबाह्य व्यावसायिक वापराच्या आरोपांमुळे पालिकेने संबंधित जागा सील केली.
महापालिकेच्या प्राथमिक तपासात या मालमत्तेवर तब्बल 3.20 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याचं समोर आलं आहे. वारंवार नोटिसा देऊनही कर न भरल्यामुळे अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
ही कारवाई केवळ कर थकबाकीपुरती मर्यादित राहिलेली नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, इमारतीच्या मूळ आराखड्यात परवानगीशिवाय बदल करण्यात आले होते. पार्किंगच्या जागांमध्ये फेरफार, अतिरिक्त बांधकाम आणि नियमबाह्य बदल आढळून आल्याने बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात अनधिकृत भागांवर कारवाई सुरू केली. घटनास्थळी बुलडोझर दाखल करण्यात आला असून, नियमबाह्य बांधकाम हटवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणात CBI ने शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. तपास यंत्रणेला पेपरफुटी रॅकेटमध्ये त्यांच्या भूमिकेबाबत संशय असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर आता स्थानिक प्रशासनानेही संबंधित आर्थिक आणि मालमत्ता व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे.
पुणे महानगरपालिका केवळ JM रोडवरील RCC कॅम्पसपुरती चौकशी थांबवणार नसल्याचं संकेत मिळत आहेत. मोटेगावकर यांच्याशी संबंधित शहरातील इतर मालमत्तांवरही थकीत कर, परवानग्या आणि बांधकाम नियमांचं उल्लंघन झालं आहे का, याची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या मोटेगावकर यांच्यासाठी आता कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींचा फास आणखी आवळला जात आहे.