

4 Day Work Week India Labour Code: नोकरी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘4 डे वर्किंग मॉडेल’ आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. नवीन लेबर कोड लागू झाल्यानंतर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आठवड्यात फक्त चार दिवस ऑफिसला जावं लागू शकतं आणि सलग तीन दिवस सुट्टी मिळू शकते. मात्र, ही सुविधा काही अटींसह असेल.
नव्या नियमांनुसार, आठवड्यातील एकूण कामाचे तास 48 पेक्षा जास्त असणार नाहीत. मात्र, जर एखाद्या कर्मचाऱ्याने 4 दिवसांचे वर्क मॉडेल निवडले, तर त्याला दररोज जवळपास 12 तास काम करावं लागू शकतं.
या 12 तासांच्या शिफ्टमध्ये ब्रेक आणि विश्रांतीचाही वेळ समाविष्ट असेल. म्हणजेच, कमी दिवस ऑफिस पण जास्त वेळ काम असा हा फॉर्म्युला असेल. ज्यांना लाँग वीकेंड आवडतो, त्यांच्यासाठी हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.
या नव्या व्यवस्थेतील महत्त्वाची बाब म्हणजे कंपन्या किंवा बॉस कर्मचाऱ्यांवर हा नियम लादू शकणार नाहीत. हा पर्याय पूर्णपणे ऐच्छिक (Optional) असेल.
कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचारी दोघांची संमती असेल तरच हा नियम लागू होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या इच्छेविरुद्ध 12 तासांची शिफ्ट लावली जाणार नाही.
नव्या नियमांनुसार, एखाद्या कर्मचाऱ्याकडून आठवड्यात 48 तासांपेक्षा जास्त काम करून घेतल्यास कंपनीला अतिरिक्त वेळेसाठी दुप्पट दराने ओव्हरटाईम द्यावा लागेल.
विशेष म्हणजे, आता दररोजच्या कामाच्या तासांपेक्षा आठवड्यातील एकूण कामाच्या वेळेला अधिक महत्त्व दिलं जाणार आहे. त्यामुळे कंपन्यांना वर्किंग पॅटर्नमध्ये अधिक लवचिकता मिळेल.
हा 4 दिवस कामाचा पर्याय विशेषतः IT, ITeS, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC), मार्केटिंग, डिझायनिंग आणि प्रोजेक्ट-आधारित क्षेत्रांसाठी फायदेशीर मानला जात आहे.
या क्षेत्रांमध्ये वर्क फ्रॉम होम आणि फ्लेक्सिबल वर्किंग कल्चर आधीपासून असल्याने नवीन मॉडेल लागू करणं तुलनेने सोपं जाईल.
मात्र, हेल्थकेअर, रुग्णालये, हॉटेल्स, रिटेल, ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रांसाठी हे मॉडेल लागू करणं मोठं आव्हान ठरू शकतं.
कारण या क्षेत्रांमध्ये 24x7 सेवा आवश्यक असते आणि सतत कर्मचाऱ्यांची उपस्थिती महत्त्वाची असते. एकूणच, आठवड्यात 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी ही कल्पना आकर्षक वाटत असली, तरी त्यासाठी अधिक वेळ काम करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.