

पुणे: उन्हाचे चटके सहन करत काही किलोमीटर अंतर कापून वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक ‘नीट’ परीक्षा 3 मे रोजी शहरांमधील विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांनी दिली आणि विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते. परंतु निकाल समजण्याऐवजी विद्यार्थ्यांना अचानक संबंधित परीक्षा रद्द करण्यात आल्याचे समजले आहे. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले असून, आमची नेमकी चूक काय, असा प्रश्न विचारत नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर (एनटीए) आगपाखड केली आहे.
‘एनटीए’मार्फत वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असून, विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘नीट’सारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मी ‘नीट’चा अभ्यास करत आहे. पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाल्याचे समजत आहे, गेल्या दोन वर्षांपासून मी तयारी करत आहे, एवढ्या मोठ्या परीक्षेचा पेपर फुटू शकतो, याचे विशेष वाटत आहे. दोन वर्षे घरापासून दूर राहून ‘नीट’चा अभ्यास करून सर्व मेहनत वाया गेल्याचे दुःख आहे, आता पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे.
समीक्षा घरबुडे, परीक्षार्थी
घरची परिस्थिती हलाखीची असतानाही ’नीट’ परीक्षेचा दोन वर्षांपासून चांगल्या प्रकारे अभ्यास करत होते. जिद्दीने अभ्यास केला आणि पेपर चांगला सोडवल्यामुळे 650 पेक्षा जास्त गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. अचानक पेपर रद्द झाला असे कळल्यानंतर धक्का बसला. आता नव्याने परीक्षा द्यायचे म्हटल्यानंतर दडपण व ताण निर्माण झाला आहे.
राजलक्ष्मी सावळे, परीक्षार्थी
सतत दोन वर्षे परीक्षेची तयारी, बारावी परीक्षा तसेच नीट परीक्षा देणे व पुन्हा ’नीट’ची परीक्षा म्हटल्यानंतर खूप तणाव येतो व मानसिक खच्चीकरण झाले आहे.
श्रावणी सोमवंशी, परीक्षार्थी
2024 साली ‘नीट’ परीक्षेत पेपरफुटी झाली होती आणि या मागील सूत्रधारांना शोधून कडक शासन करण्याची भूमिका घेऊन केंद्र सरकारने याचा तपास ‘सीबीआय’कडे सोपवला होता. हा तपास आजही गुलदस्त्यात आहेत. 2024 च्या घोटाळ्याचा तपास पूर्ण होऊन कोर्टात खटले दाखल झाले असते, तर कदाचित 2026 मध्ये पेपरफुटी घोटाळा करायची हिंमतच झाली नसती. किमान आता तरी 2024 च्या नीट परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीची सद्य:स्थिती प्रसिद्ध करण्याचे धाडस सीबीआय दाखवेल का हा खरा प्रश्न आहे.
विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे
2024 मध्ये ‘नीट’ परीक्षेत आर्थिक उलाढाल व ग््रेास मार्क वाढ झाल्याचे स्पष्ट झाले होते. अशाने मुलांचे मानसिक खच्चीकरण होणारच आहे. पैशाने सर्व काहीही विकत घेता येते असा दीर्घकालीन ठपका या परीक्षा व्यवस्थेवर बसला आहे. उत्तम प्रशासन अशी घोषणा करणाऱ्या या केंद्र सरकारला परीक्षाही धड घेता येत नाही. प्रामाणिक विद्यार्थ्यांना हा मोठा मानसिक धक्का आहे.
मुकुंद किर्दत , प्रवक्ता, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र
देशभरातील सर्व राज्यांतील परीक्षा केंद्रावर पेपरफुटीचे अनुचित प्रकार घडले आहेत का, याचा खुलासा न करता सर्व राज्यांत पुनःश्च परीक्षा राबविली जाणार असल्याचे माहिती समोर येत आहे. असा निर्णय घेतल्यास अनुचित प्रकार घडले नाहीत, त्या सर्व केंद्रांवरील सामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडलेल्या केंद्राची परीक्षा रद्द करण्याची गरज आहे.
कल्पेश यादव, सहसचिव युवासेना (शिवसेना ठाकरे गट)