पुणे : सिंहगड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पाचशे पथारी व्यावसायिक गायब

सिंहगड क्षेत्रीय कार्यालय
सिंहगड क्षेत्रीय कार्यालय
Published on
Updated on

हर्षद देशपांडे

सिंहगड रोड : नेमून दिलेल्या जागेवरच पथारी व्यावसायिकांनी व्यवसाय करणे बंधनकारक असते, मात्र सातत्याने होणार्‍या कारवाईला कंटाळून सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असणार्‍या सुमारे ५०० पथारी व्यावसायिकांनी हद्दबदल किंवा व्यवसाय बंद केला असल्याचे 'दै. पुढारी'च्या पाहणीमध्ये दिसून आले आहे.

साधारण फेब्रुवारी महिन्यात प्रशासक आल्यानंतर अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाया केल्या होत्या. मुळात अनधिकृत पथारी व्यावसयिकांवर होणार्‍या कारवाईमुळे अनेक अधिकृत पथारी व्यावसायिकदेखील अडचणीत आले. आपल्यावरदेखील कारवाई होणार, या भीतीने अनेकांनी असलेल्या जागेवरून एक तर झोन बदलून घेतले किंवा त्यांनी व्यवसाय बंद केला. कर आकारणीची बिले पथारी व्यावसायिकांना देण्यास पालिकेच्या कर्मचार्‍यांनी सुरुवात केल्यानंतर 711 अधिकृत पथारी व्यावसायिकांपैकी केवळ 200 व्यावसायिक जागेवर व्यवसाय करीत आहेत. राहिलेल्या सुमारे 500 पथारी व्यावसायिकांनी आपला गाशा गुंडाळला असल्याचे चित्र आहे.

गतवर्षी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सुमारे 25 लाख 17, हजार 888 रुपयांची कर वसुली केली होती. मात्र, या वेळी सुमारे 500 च्या आसपास पथारी व्यावसायिक गायब असल्याने आता वसुली कशी करायची, असा प्रश्न पालिकेच्या अधिकार्‍यांसमोर उभा राहिला आहे. कोरोनापूर्वी कर आकारणीची बिले थेट टपालाच्या साहाय्याने पाठविण्यात आली होती, या वेळी मात्र जागेवर जाऊन बिले देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ही बाब उघडकीस आली.

पथारी व्यावसायिकांची संख्या भरमसाठ वाढली

काही वर्षांपूर्वी शासनाने घेतलेल्या धोरणानुसार अधिकृत परवाने मिळत होते. मात्र, अनेकांनी परवाना मिळतोय म्हणून परवाना काढून घेतला. यामुळे अधिकृत पथारी व्यावसायिकांची संख्या भरमसाट वाढली आहे. यात ज्यांनी परवाने मिळविले त्यांनी एकतर व्यवसायच केला नाही किंवा परवाने भाड्याने दिलेत, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर अतिक्रमण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

प्रभाग समितीने पथारी व्यावसायिकांना विश्वासात न घेता झोनची रचना केली आहे, ती अनेक व्यावसायिकांना मान्य नाही. सनसिटी, फनटाईम अशा ठिकाणी व्यवसायासाठी जागा उपलब्ध केली असली तरी ती सर्व पथारी व्यावसायिकांना फायदेशीर नाही, त्यामुळे अनेकांना नाईलाजास्तव हातगाडीच्या मदतीने व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक जागेवर उपलब्ध नाहीत, असे जाणीव संघटनेचे कैलास बोरगे यांनी सांगितले.

तीन नोटिशीनंतर परवाना रद्द होणार

कोणत्याही अधिकृत पथारी व्यावसायिकांना तीन नोटिसा दिल्यानंतर त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो. सध्याच्या घडीला अनेक पथारी व्यावसायिक जागेवर उपलब्ध नसल्याने अशा अनेक व्यावसायिकांना आगामी काळात नोटिसा बजावण्यात येऊ शकत असल्याचे सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण अधिकारी धम्मानंद गायकवाड यांनी सांगितले. परवाना रद्द झाल्यास पालिकेचा महसूलदेखील बुडणार असल्याने काही वर्षांपूर्वी पालिकेने एवढे परवाने का वितरित केले, असा प्रश्न अनुत्तरीतच राहातो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news