

दिवे : पुरंदर तालुक्यात इतर तरकारी भाजीपाला पिकांबरोबरच पावट्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. पावटा तसा वालवर्गीय आहे; मात्र अलीकडे पावट्याचे अनेक नवनवीन वाण आले आहेत. परंतु, चविष्ट अशा पुरंदरमधील गावरान पावट्याला ग्राहकांची पसंती असते.
गावरान पावटा हा दिवाळीनंतरच बाजारात येतो. आकाराने थोडासा वक्राकार असलेल्या पावट्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत; मात्र पुरंदर तालुक्यात पूर्वीपासून गावरान पावट्याला ’पाणवडी’ पावटा या नावानेच ओळखले जाते. सध्या पावट्याचा हंगाम सुरू झाला असून स्थानिक ढुमेवाडी, सासवड बाजारात पेण, आलिबाग, पनवेल, कोल्हापूर, सातारा, सांगली भागातून मोठ्या प्रमाणात व्यापारी पावटा खरेदीसाठि येत आहेत. सध्या पावट्याला प्रतिकिलो 60 रुपयांच्या आसपास बाजारभाव मिळत आहे.
दिवे येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर झेंडे व सुभद्रा झेंडे या दाम्पत्याने आपल्या 20 गुंठे क्षेत्रावर पावट्याची लागवड केली असून पीक अतिशय जोमदार आले आहे. सध्या त्याची तोडणी सुरू आहे. ढुमेवाडी बाजारात त्याला समाधानकारक दर मिळत असल्याचे झेंडे यांनी सांगितले.
दिवे ग्रामपंचायतीच्या वतीने ढुमेवाडी येथे तरकारी भाजीपाला बाजार भरवला जातो. याठिकाणी शेतकऱ्यांकडून कुठलेही शुल्क आकारले जात नाही. हा बाजार संध्याकाळी 6 वाजता सुरू होतो. सध्या पावट्याची मोठी आवक होत असून व्यापारीदेखील मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत आहेत.
गुलाब झेंडे, माजी सरपंच, दिवे