पुणे : जुन्नर तालुक्यात होणार राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था

पुणे : जुन्नर तालुक्यात होणार राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा

जुन्नर तालुक्यात राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयुष मंत्रालयाकडे ई-मेलद्वारे सादर केल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

जुन्नर, आंबेगाव तालुक्यांच्या दुर्गम आदिवासी भागात विशेषतः भीमाशंकर अभयारण्यात गुळवेल, हिरडा यांसारख्या विविध प्रकारच्या असंख्य वनौषधी आढळतात. आयुर्वेदात या वनौषधींना महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, या वनौषधींचे संशोधन, संवर्धन आणि लागवड तसेच त्यावर प्रक्रिया करणे आदींसाठी शास्त्रोक्त पद्धतीने कार्य करण्यासाठी राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था असावी, अशी संकल्पना खासदार डॉ. कोल्हे यांनी मांडली होती. त्यानुसार या संस्थेचा डीपीआर तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन निधीतून निधीही मंजूर केला होता.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रकल्प समन्वयक प्रो. डॉ. दिगंबर मोकाट आणि प्रकल्प समितीचे डॉ. डी. जी. नाईक, डॉ. गिरीश टिल्लू, प्रो. अविनाश आडे यांच्यासमवेत चर्चा करताना खा. डॉ. अमोल कोल्हे.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रकल्प समन्वयक प्रो. डॉ. दिगंबर मोकाट आणि प्रकल्प समितीचे डॉ. डी. जी. नाईक, डॉ. गिरीश टिल्लू, प्रो. अविनाश आडे यांच्यासमवेत चर्चा करताना खा. डॉ. अमोल कोल्हे.

… तर उच्च दर्जा प्राप्त होईल

राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था निर्मिती करण्यासाठी जर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत प्रयत्न केल्यास या संस्थेला एक उच्च दर्जा प्राप्त होईल, या विचारातून डॉ. कोल्हे यांनी 31 जुलै 2021 रोजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेतली होती. या संकल्पनेला तत्काळ प्रतिसाद देत या प्रकल्पासाठी प्रो. डॉ. दिगंबर मोकाट यांची समन्वयक आणि डॉ. डी. जी. नाईक, डॉ. गिरीश टिल्लू, प्रो. अविनाश आडे यांची समिती स्थापन केली होती. कुलगुरू डॉ. करमळकर आणि खासदार डॉ. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीने राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्थेचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला 12 मार्च 2022 रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती.

प्रकल्प समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, कुलगुरू डॉ. करमळकर यांनी दि. 18 मे 2022 रोजी जुन्नर तालुक्यात राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था उभारण्याचा प्रस्ताव सचिव, केंद्रीय आयुष मंत्रालय यांना ई-मेलद्वारे सादर केला. या प्रस्तावानुसार राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रायबल मेडिसीन अभ्यासक्रमाची रचना करेल आणि आदिवासी वैद्यक क्षेत्रात प्रमाणपत्र कार्यक्रम, डिप्लोमा, पदवी आणि पीएचडी यांसारख्या विविध स्तरांवर अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news