Pune News : अनधिकृत प्रवेश देणार्‍या संस्थांवर गुन्हे दाखल करणार

Pune News : अनधिकृत प्रवेश देणार्‍या संस्थांवर गुन्हे दाखल करणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार्‍या टायपिंग परीक्षेसाठी आमची संस्था मान्यताप्राप्त असून, आमच्याकडे प्रवेश घ्या व निश्चिंत राहा. आमच्याकडेपण शासनाची परवानगी आहे. अशा प्रकारची खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन अनेक विद्यार्थ्यांना फसविण्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा प्रकारे अनधिकृत व नियमबाह्य काम करणार्‍या संस्थांवर आता गुन्हे दाखल करून त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिला आहे.

डॉ. बेडसे म्हणाले, 'महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याशी सलग्न असलेल्या जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षा एप्रिल 2024 साठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या मान्यताप्राप्त टायपिंग संस्थांची यादी तपासून पाहावी.

त्यानंतर त्या संस्थेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या ई- प्रमाणपत्रावरील त्याच संस्थेचे नाव व पत्ता बरोबर आहे का? याची खातरजमा करूनच प्रवेश घ्यायचा आहे. अन्य नियमबाह्य संस्थांमधून संगणकीय टायपिंगसाठी प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी आपली फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

परीक्षा परिषदेने आता जीसीसी टीबीसी परीक्षा अर्ज भरताना काही नवीन सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार अनधिकृत प्रवेशांना आळा घालण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आता संस्थेमध्ये कोर्सला प्रवेश घेतानाच परीक्षेचा प्राथमिक अर्ज ऑनलाइन भरून घेतला जाईल. त्यामुळे ऐन वेळी परीक्षा अर्ज भरून घेणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणे या गैरप्रकारांना आपोआपच आळा बसणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आता अनधिकृत संस्था व विद्यार्थी बसविणार्‍यांवर कडक नजर ठेवून आहे. त्यामुळे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांनी नियमबाह्य कामे करू नयेत. नियमबाह्य संस्थांचे विद्यार्थी परीक्षेसाठी घेऊ नयेत व तसे दिसून आल्यास कडक कार्यवाहीसाठी तयार राहावे, असा सूचक इशाराही संस्थाचालकांना देण्यात आला आहे.

पाच टॉपर विद्यार्थ्यांचा होणार सत्कार…

परीक्षा परिषदेने या वर्षीपासून प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विषयातील सर्वाधिक गुण मिळविलेल्या पाच विद्यार्थ्यांची नावे जाहीर करून त्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अलीकडेच ती यादी जाहीर करण्यात आली आहे. भविष्यातदेखील विविध उपक्रमांच्या माध्यमातून जीसीसी टीबीसी संगणकीय टायपिंग व लघुलेखन या विषयांमध्ये सकारात्मक बदल करण्यात येणार असल्याचे डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news