‘या’ देशात पेंग्विन बनला मेजर जनरल! | पुढारी

‘या’ देशात पेंग्विन बनला मेजर जनरल!

ओस्लो : जगाच्या पाठीवर काही देशांमध्ये पशुपक्ष्यांनाही मानवी जगतातील मोठी पदं बहाल केली जात असतात. अगदी कुत्र्याला महापौरपदही दिले जात असते. आता एका देशामध्ये चक्क पेंग्विनला लष्करामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. या पेंग्विनला मेजर जनरलची पदवी देण्यात आली आहे. या देशातील हे तिसरे सर्वात मोठे पद आहे.

ज्या देशामध्ये पेंग्विनला पदवी देण्यात आली तो देश म्हणजे नॉर्वे. हा सोहळा अगदी थाटामाटात साजरा करण्यात आला. नॉर्वेमधील एडिनबर्ग प्राणीसंग्रहालयामध्ये राहणार्‍या सर निल्स ओलाव थ्री नावाच्या एका पेंग्विनला नॉर्वेच्या लष्कराने मेजर जनरल पद बहाल केले. पेंग्विन हा पक्षी नॉर्वेच्या नॉर्वेजियन किंग्ज गार्ड म्हणजेच लष्करासाठी लकी मानला जातो. त्यामुळेच त्याला हे पद देण्यात येते.

प्राणीसंग्रहालयामध्ये आयोजित एका शानदार कार्यक्रमामध्ये सर निल्स ओलाव थ्री या पेंग्विनला हे पद देण्यात आले. पेंग्विनला लष्करी पद देण्याची परंपरा या देशामध्ये 1972 पासून आहे. 1972 साली नॉर्वेच्या लष्कराने पहिल्यांदा एक पेंग्विन दत्तक घेतला होता. तेव्हापासूनच पेंग्विनला लष्कराकडून असे पद देण्याची पद्धत सुरू झाली. सर निल्स ओलाव थ्री हा पेंग्विन आधी ब्रिगेडिअर पदावर होता. आता त्याला मेजर जनरल पद बहाल करण्यात आले.

Back to top button