पुणे : पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षी कमी झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये मर्यादित स्वरूपाचा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी पाणीवापर नियंत्रित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दोन्ही आयुक्तांना दिले.
दररोजच्या पाणीवापरावर बारकाईने लक्ष ठेवावे, बेकायदा पाणीभरणा केंद्रे बंद करावीत, वाहने धुण्यासाठीची केंद्रे बंद करावीत, बांधकामांना प्रक्रिया केलेले पाणीच द्यावे, असेही आदेश जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या निवडणूकविषयक तयारीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे बोलत होते. सध्या कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. धरणांमध्ये उपलब्ध पाणी हे शहरी आणि ग्रामीण भागाला समान पद्धतीने पुरविणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, 'शहरी भागातून पाण्याची बचत झाली, तर मे महिन्यात ग्रामीण भागाला पाणी देता येणे शक्य होणार आहे.'
ग्रामीण भागात चारा आणि पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता लक्षात घेऊन दर महिन्याला टंचाई आराखडा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी स्पष्ट केले. सध्या जिल्ह्यातील 81 गावांतील 533 वाड्या-वस्त्यांना 108 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एक लाख 64 हजार 25 नागरिक बाधित असून, 31 विहिरी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. उन्हाळा सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा टंचाई आराखडा तयार केला जातो. मात्र, यंदा दुष्काळी स्थिती असल्याने तीन महिन्यांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार आहे.
हेही वाचा