आजाराचा विचार करता तरुण आणि ज्येष्ठ यांच्यामध्ये आता काही फारसा फरक राहिलेला नाही. कारण पूर्वी वार्धक्यात दिसून येणारे आजार आता तरुणांमध्ये दिसताहेत. जीवनशैलीतील बदल आणि आहराच्या सवयींमधील बदल, यामुळे अनेक तरुण विविध आजारांनी ग्रस्त आहेत. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, तरुणांमध्ये अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस रोगाने ग्रस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.
या आजारात मणक्याचे हाड वाढते आणि ते कडक होते. त्यामुळे रुग्णाला बसणेही अवघड होते. अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस झाल्यास पीडित व्यक्तीला चालणे, फिरणे, उठणे, बसणे आणि योग्य पद्धतीने उभे राहण्यातही अडचणी येतात विशेष म्हणजे भारतात दर 100 माणसांमागे एका माणसाला हा आजार असल्याचे दिसून येते. या विकाराची तक्रार बहुतांश वेळा 20 ते 30 वर्ष वयात जाणवते.
हा आजार होण्यासाठी वयोमर्यादा नसली तरी 15 ते 35 वयोगटातील व्यक्तींमध्ये हा सामान्यतः आढळून येतो. एकूण लोकसंख्येच्या 0.1 ते 0.2 टक्के लोकांना आजार होत असल्याचे काही पाहण्यांमधून दिसून आले आहे. पुरुषांमध्ये हा आजार महिलांच्या तुलनेत पाच पटीने अधिक आढळतो.
तज्ज्ञांच्या मते आपल्या देशात मणक्याच्या हाडांचे दुखणे आणि सांधेदुखीची तक्रार करणारे वाताचे रुग्ण अनेक अडचणींना तोंड देत आयुष्य जगत असतात. अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिसवर योग्य वेळी उपचार झाले नाहीत, तर व्यक्तीची अवस्था अधिकच खराब होते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, या रुग्णांच्या आयुष्यात शारीरिक, मानसशास्त्रीय आणि पर्यावरणीय कारकांवरही नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञांच्या मते अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस हा सूज येणार्या आणि ऑटोइम्युन प्रकारातला आजार असल्याने मणक्याच्या हाडांवर त्याचा परिणाम होतो. या व्याधीने ग्रस्त तरुणांच्या शैक्षणिक, व्यावसायिक कारकिर्दीवर परिणाम होतोच; परंतु त्यांचे मानसिक स्वास्थ्यही बिघडते.
एका पाहणीनुसार, आज देशात अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस ग्रस्त 10 लाख रुग्ण आहेत. पण या विकाराने पीडित रुग्णांची खरी आकडेवारी प्रत्यक्षात समोर येत नाही. कारण, अजूनही ह्या विकाराविषयी फारशी जागृती झालेली नाही. या रुग्णांमध्ये वेदनाशामक गोळ्या वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. पण, ही औषधे घेऊनही अनेकदा रुग्णांना हाडे आखडणे आणि वेदना होत राहतात. त्यामुळे एकूणच शारीरिक संरचनेचे नुकसान होते आणि सांध्यांमधील सुजेमुळे मणक्याचे हाड खूप घट्ट होते. परिणामी, व्यक्ती विकलांग होऊ शकतेे. यावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णाला चालण्या-फिरण्यास त्रास होऊ शकतो आणि ऑफिसमध्ये दीर्घ काळ बसणेही त्यांना शक्य होत नाही. परिणामी, एकूणच आयुष्यावर त्याचा परिणाम होताना दिसतो.