कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील विशाल ऊर्फ अनिल बाळासाहेब रूपनर (वय 24, रा. खंडेराजुरी, ता. मिरज) या माक्यातील कैद्याने पोलिसांच्या भरधाव मोटारीतून उडी टाकून पलायन केले. मात्र, चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्यास नांदेड जिल्ह्यातील मडकी कळंबर येथून जेरबंद करण्यात आले. सोनखेड (नांदेड) येथे हा थरार घडला.
मोकाअंतर्गत कारवाई झालेल्या कळंबा कारागृहातील चार कैद्यांची सुरक्षेच्या कारणामुळे चंद्रपूर येथील कारागृहाकडे रवानगी करण्यात येत होती. नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशाल ऊर्फ अनिल रूपनर याने पोलिसांच्या मोटारीतून उडी टाकून पलायन केले.
सोमवारी पहाटे सोनखेड हद्दीत वाहनाची गती कमी असल्याचे निदर्शनास येताच रूपनर याने मोटारीचा दरवाजा उघडून बाहेर उडी टाकली. क्षणार्धात तो अंधारात दिशेनासा झाला. स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चार तासांनंतर त्यास सकाळी ताब्यात घेण्यात आल्याने ड्युटीवरील पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.