पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इसाक दार यांनी अलीकडेच आम्ही भारताशी व्यापार आणि आर्थिक व्यवहारांबाबत विचार करू शकतो, असे म्हटले आहे. याचाच अर्थ भारतावर लादलेला पाक्स्तान पुरस्कृत दहशतवाद, भारताविरुद्धची द्वेष भावना, देशात पसरविला जाणारा फुटिरतावाद, अस्थिरता या गोष्टींवर चर्चा न करता भारताशी व्यापार करणे फायद्याचे असल्याने ते याच मुद्द्यावर बोलू इच्छित आहेत. आता प्रश्न असा की, पाकिस्तानशी व्यापार करणे हे भारताच्या हिताचे आहे की नाही?
भारताशी व्यापार करण्यावरून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इसाक दार यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. लंडन येथील एका पत्रकार परिषदेत त्यांना उभय देशांतील संबंधांबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नात व्यापाराचा समावेश नव्हता; मात्र परराष्ट्रमंत्री म्हणाले, किमान आम्ही व्यापार आणि आर्थिक व्यवहारांबाबत विचार करू शकतो. याचाच अर्थ भारतावर लादलेला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, भारताविरुद्धची द्वेष भावना, देशात ठिकठिकाणी पसरविला जाणारा फुटिरवाद, देशात निर्माण केली जाणारी अस्थिरता या गोष्टींवर चर्चा केली जाणार नाही; मात्र भारताशी व्यापार करणे फायद्याचे असल्याने ते याच मुद्द्यावर बोलू इच्छित आहेत. आता प्रश्न असा की, पाकिस्तानशी व्यापार करणे हे भारताच्या हिताचे आहे की नाही? पाकिस्तानशी व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात देवाणघेवाण सुरू केल्याने आपल्याला कोणताही लाभ मिळणार नाही. पाकिस्तानशी व्यापार करतो की नाही, या गोष्टीने आपल्याला काही फरक पडत नाही.
अफगाणिस्तानापर्यंत एखादी वस्तू पाठवायची असेल तर त्यासाठी पाकिस्तान मार्ग खुला करून देतो आणि त्याचा फायदा अफगाणिस्तानला होतो. याचा आपल्यावर काही फरक पडत नाही. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था ही लहान आहे. त्याचवेळी व्यापारी सुरक्षेचाही प्रश्न आहे. पाकिस्तानातून तेल पाईपलाईन जात असेल किंवा त्या मार्गाने व्यापार होत असेल, तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तान घेईल ही बाब आपल्याला मान्य असेल का? कारण पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर तो वाटेल तेव्हा पाईपलाईन बंद करेल किंवा त्याचा मार्ग रोखेल. असे तर होऊ शकत नाही.
आर्थिक वर्ष 2023-23 मध्ये भारताचा एकूण परकी बाजार 1.6 ट्रिलियन डॉलर होता आणि तो जीडीपीच्या एकूण 48 टक्के होता. त्या आर्थिक वर्षात पाकिस्तानला भारताची निर्यात 627 दशलक्ष डॉलर (एकूण निर्यातीच्या 0.1 टक्का) आणि पाकिस्तानची आयात 20 दशलक्ष डॉलर (एकूण आयातीच्या 0.003 टक्का) राहिली आहे. यावरून आर्थिक द़ृष्टीने पाकिस्तान हा आपल्यासाठी कोणत्याही अर्थाने महत्त्वाचा नाही; मात्र पाकिस्तानसाठी ही बाब खूप लाभदायी राहू शकते. त्यांना औषधांसह अनेक गोष्टी स्वस्तात मिळू शकतात. कांदे, टोमॅटो आदींचे भाव अधूनमधून वाढत असतात आणि त्यामुळे महागाई दरात वाढ होऊ शकते. वास्तविक भारतातून आयात केल्याने त्याला मोठा दिलासा मिळू शकतो.
त्याचबरोबर व्यापार वाढल्याने पुरवठा साखळीचा विस्तार होऊ शकतो. आपल्याकडे एखादी गोष्ट कमी असेल, तर देशातील अन्य भागातून त्याचा पुरवठा केला जातो. आपल्याकडे परदेशातील आयातीचे पर्यायही आहेत. आजघडीला तिसर्या देशांच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानमध्ये व्यापार होत आहे. यात भारतीय व्यापार्यांना पैसा मिळतो; परंतु तिसर्या देशांमार्फत सामान येत असल्याने पाकिस्तानला जादा किंमत मोजावी लागत आहे. थेट व्यापार नसल्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागत आहे. आपण पाकिस्तानशी व्यापार केला, तर आपले संबंध चांगले होतील, असा एक विचार आहे; परंतु त्याची हमी कोणाकडेही नाही. महायुद्धाच्या इतिहासाचा विचार केल्यास आता रशिया-युक्रेन युद्धाचेच घ्या. या देशांत बराच व्यापार व्हायचा; परंतु युद्ध सुरू झाल्यानंतर सर्वकाही बंद झाले. तेल आणि गॅसची पाईपलाईनही बंद झाली आहे. म्हणून व्यापार झाला तर युद्ध होणार नाही, असे म्हणणेदेखील निरर्थक आहे.