पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाहनचालकांच्या पाठदुखीला रस्त्यावरील खड्डे जितके कारणीभूत आहेत, तितकेच गतिरोधकही कारणीभूत असल्याने महापालिका प्रशासनाने शहरातील गतिरोधक टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी भागात अशास्त्रीय गतिरोधकांमुळे वाहतुकीची गती मंदावण्यासोबतच वाहनचालकांना विशेषत: दुचाकीचालकांना पाठीच्या दुखण्याचा त्रास सोसावा लागतो. यासंदर्भात काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्यात आल्यानंतर न्यायालयाने इंडियन रोड काँग्रेसच्या मानकानुसार गतिरोधक उभारण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
यानंतर सुरुवातीची काही वर्षे इंडियन रोड काँग्रेसच्या मानकानुसारच गतिरोधक उभारण्यावर भर देण्यात आला. परंतु, रस्त्यांची दुरुस्ती व नूतनीकरणानंतर अनेक ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने गतिरोधक उभारण्यात आले आहेत. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार जुन्या हद्दीत तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील दीड हजार किमी रस्त्यावर दोन हजारांहून अधिक गतिरोधक तयार करण्यात आले. अनेक गतिरोधकांजवळ पाणी साठून आणि ते रस्त्यात मुरून खड्डे पडत आहेत.
काही ठिकाणी गतिरोधकांच्या अडथळ्यांमुळे पावसाचे पाणी गटारांमध्ये जात नाही. तसेच मागील काही वर्षांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून, त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होत आहे. गतिरोधकांमुळे त्यात अधिकच भर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मागील सहा महिन्यांपासून रस्त्यांची कामे करताना गतिरोधक तयार करणे बंद केले आहे. तसेच, पुढील काळात अशास्त्रीय गतिरोधक काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील अशास्त्रीय गतिरोधक काढण्यात येणार आहेत. गरज असेल तेथेच पोलिसांच्या सूचनेनुसार इंडियन रोड काँग्रेसच्या मानकानुसार 3 मीटर रुंदीचे व 10 मिमी उंचीचेच गतिरोधक तयार करण्यात येतील.
– साहेबराव दांडगे, कार्यकारी अभियंता,
पथ विभाग, महापालिका
हेही वाचा