

पुणे : 'राज्यातील महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने प्रशासकराज आहे. मात्र, प्रशासकांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे गरजेचे आहे,' असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी व्यक्त केले. डॉ. गोर्हे यांनी पुण्यातील निवासस्थानी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे, युवा सेनेचे नेते किरण साळी उपस्थित होते. त्या म्हणाल्या, की महापालिकांमध्ये प्रशासक राज असल्याने अधिकारी मनमानी पद्धतीने काम करीत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.
आता नगरसेवक नसले तरी स्थानिक आमदार, खासदार आहेत. मात्र, प्रशासनाकडून स्थानिक लोकप्रतिनिधींना कोणतीही कल्पना न देता कार्यक्रम घेतले जात आहेत. प्रशासकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन जबाबदारीने काम करावे. कामात सुधारणा न केल्यास त्यांना येणार्या आधिवेशनात आमदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असेही त्या म्हणाल्या. मागील अडीच वर्षांच्या काळात ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत, या प्रश्नावर डॉ. गोर्हे म्हणाल्या, 'ते दोन्ही मोठे नेते असून, ते मतभेदाकडून मनभेदाकडे जात आहेत.
मला त्या दोघांचं नातं हे प्रेम आणि तिरस्कारासारखे वाटते आहे. ते दोघे रागातून आणि तिरस्काराने एकमेकांना बोलतात. त्या दोघांच्या वादामध्ये मला द्वेष आणि त्वेष दिसून येतो. फडणवीस यांच्याकडून तेवढे अपशब्द ऐकले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाकरी बाणा पाहायला मिळतो. पण, बाळासाहेब जरी रागवून बोलले तरी ते नंतर हसवून सर्व मिटवत होते. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही करावे.' मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, की कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतील.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषदेत दिलेला पेनड्राईव्ह आपण मुंबई पोलिस आयुक्तांना दिला आहे. या पेनड्राईव्हसंदर्भात आपण लवकरच मुंबई पोलिस आयुक्तांना विचारणा करणार असल्याचेही डॉ. गोर्हे यांनी यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
हेही वाचा