नाशिकमध्ये सिमेंटशिवाय काॅंक्रिटीकरणाचा प्रयोग यशस्वी, देशातील पहिलाच प्रयोग | पुढारी

नाशिकमध्ये सिमेंटशिवाय काॅंक्रिटीकरणाचा प्रयोग यशस्वी, देशातील पहिलाच प्रयोग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जगभरात कार्बन उत्सर्जन रोखण्याच्या उद्देशाला धरून अनेक प्रयोग केले जात आहेत. ‘ग्रीन बिल्डिंग’ची संकल्पना सर्वच क्षेत्रात आता रुजत आहे. याच संकल्पनेला अनुसरून महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड व जेके वेअरहाउसिंग प्रा. लि. यांनी संयुक्तपणे सिमेंटशिवाय कॉंक्रिटीकरण करून प्रयोग यशस्वी केला आहे. नाशिकमधील बेळगाव ढगा येथील ज्येष्ठ उद्योजक तथा माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांच्या जे. के. वेअरहाउसमध्ये हा प्रयोग झाला.

स्टील उत्पादन करणाऱ्या उद्योगांना ब्लास्ट फर्नेसमधून निघणाऱ्या स्लॅगची विल्हेवाट लावणे हा पर्यावरणाच्यादृष्टीने अत्यंत जिकरीचा विषय आहे. स्लॅग आणि सिमेंटचे गुणधर्म सारखेच आहेत. स्लॅबमध्ये काही प्रमाणात अॅक्टिव्हेटर्स टाकून मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण सिमेंटपेक्षाही अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. टाटा स्टील लिमिटेड व इको मटेरिअल्स यांनी संयुक्तपणे हे मिश्रण तयार केले असून, त्याचे पेटंटही प्राप्त झाले आहे. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे कंपनीने सांगितले. यावेळी महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडचे प्रतिनिधी सौरव रक्षित, विश्वास जाधव, पंकज रास्ते, अभिजित बिस्वास, नवोदय सायन्सचे डॉ. रामकुमार नटराजन, एन. वर्धाराजन, जेके वेअरहाउसिंगचे संचालक शशिकांत जाधव, शंतनू जाधव, शुभम जाधव उपस्थित होते. अमित पाटील, महेश सारंगधर तसेच विराज इन्फ्राटेकचे अभिजित बनकर यांनी तांत्रिक साहाय्य केले.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडने २०४० पर्यंत कार्बन उत्सर्जन मुक्त कंपनी बनण्याचा निश्चय केला आहे. त्याच अनुषंगाने आम्ही नवनवीन संकल्पना राबवत आहोत.

– सौरव रक्षित

२०१३ पासून दरवर्षी वेगळी संकल्पना राबवून नावीन्यपूर्ण प्रकल्प उभे करत आहोत. बांधकाम क्षेत्रात हा एक क्रांतिकारी प्रयोग ठरेल यात शंका नाही.

– शशिकांत जाधव, संचालक जेके वेअरहाउस

नाशिकमधील एका प्रयोगाने १७६ टन कार्बन उत्सर्जन रोखण्यात यश आले. भारतभर असे प्रयोग झाल्यास खूप मोठी नैसर्गिक बचत होणार आहे.

– डॉ. रामकुमार नटराजन, नवोदय सायन्स

हेही वाचा :

Back to top button