पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या बॅगांची तपासणी | पुढारी

पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या बॅगांची तपासणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकावर आता प्रवाशांंच्या बॅगांची कडक तपासणी होणार आहे. कारण, रेल्वे प्रशासनाकडून पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या प्रवेशद्वारावर आता बॅग स्कॅनर मशिन बसवण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून रेल्वे स्थानकावरील स्कॅनर मशिन बंद पडल्यामुळे दुरुस्तीसाठी देण्यात आले होते. त्यामुळे रेल्वे स्थानक ‘आओ जाओ घर तुम्हारा’ बनले होते. कुणीही बॅगा घेऊन यायचे, मात्र, त्यांच्या बॅगांची तपासणीच पुणे रेल्वे स्थानकावर होत नव्हती.

त्यामुळे कोण प्रवासी आपल्या बॅगेमधून काय घेऊन जातोय याची माहितीच मिळत नव्हती. परिणामी, अनुचित घटना घडण्याचा धोका होता. या संदर्भात दै.‘पुढारी’कडून अनेकदा वृत्त प्रसिध्द करण्यात आले. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने वर्षभर दुरुस्तीसाठी गेलेले बॅग स्कॅनर मशिन पुन्हा रेल्वे स्थानकावर आणले असून, आता रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या बॅगांची या मशिनद्वारे तपासणी केली जात आहे.

स्कॅनर मशीन आले पण कर्मचारी नाही

नादुरुस्त असलेले स्कॅनर मशिन रेल्वे प्रशासनाने दुरुस्त करून पुणे रेल्वे स्थानकावरील मुख्यप्रवेशद्वारावर बसविले आहे. मात्र, या स्कॅनर मशीनचे काम पहाण्यासाठी एकही व्यक्ती नसल्याचे नुकत्याच केलेल्या पहाणीत समोर आले आहे. बुधवारी (दि.6) सायंकाळच्या सुमारास दै.‘पुढारी’कडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्या वेळी तेथे फक्त स्कॅनर मशीन दिसले. त्याचे नियोजन करणारा कोणताही कर्मचारी तेथे आढळला नाही. यावेळी काही प्रामाणिक प्रवासी आपल्या बॅगा स्वत: उचलून स्कॅनर मशीनमध्ये टाकत होते. तर काही प्रवासी बॅगा स्कॅनर मशीनमध्ये न टाकताच दुसर्‍या बाजूने स्थानकात प्रवेश करताना पहायला मिळाले. येथे नुसतेच स्कॅनर मशीन बसवून चालणार नसून, येथे 24 तास कर्मचार्‍यांची नेमणूक करणे आवश्यक आहे.

हेही वाचा

नाशिकमध्ये सिमेंटशिवाय काॅंक्रिटीकरणाचा प्रयोग यशस्वी, देशातील पहिलाच प्रयोग

Nashik Ganeshotsav : आतापर्यंत ४३५ पैकी अवघ्या पाच गणेश मंडळांना परवानगी

Ganeshotsav 2023 : कोकणातील गणेशभक्तांसाठी धावणार नाशिकची लालपरी

Back to top button