

पुणे: मुंढव्यातील कोट्यवधी रुपये किमतीच्या शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी (दि.10) तब्बल 10 तास चौकशी केली. त्यानंतर त्याचा जबाब नोंदवला. मात्र, चौकशीत पोलिसांना त्याने काय माहिती दिली हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान, येवलेची चौकशी सुरू असताना अटकेत असलेली शीतल तेजवानी हीसुद्धा या वेळी हजर होती. दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तेजवानी सध्या पोलिस कोठडीत असून, गुरुवारी तिला कोठडीची मुदत संपल्याने परत न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही चौकशी महत्त्वाची मानली जात आहे. बुधवारी सकाळी येवले याला चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेत बोलावून अधिकाऱ्यांनी दिवसभर त्याची कसून चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. यानंतर त्याचा जबाब नोंदवला, असे पोलिसांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील, जमिनीची कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी, तहसीलदार सूर्यकांत येवले आणि इतरांवर मुंढवा जमीन प्रकरणात पुण्यातील खडक पोलिसांत गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील, शीतल तेजवाणी, सूर्यकांत येवले यांना नोटीस देऊन चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. शीतल तेजवानीची दोनदा चौकशी केली. तसेच महार वतन वारसदारांचे जबाब नोंदवले. या चौकशीनंतर शीतल तेजवानीला अटक केली. अटकेनंतर तिला पोलिस कोठडी सुनावलेली आहे. या चौकशीपूर्वी पोलिसांनी 1 डिसेंबरला दिग्विजय पाटीलची चौकशी केली. पोलिस कोठडीत असलेल्या तेजवानीकडे चौकशी सुरू आहे. परंतु, ती तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती आहे. दरम्यान, बुधवारी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेचीही चौकशी करण्यात आली.
आज कोर्टात हजर करणार
शीतल तेजवानीची गुरुवारी पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिस आणखी 14 दिवसांची पोलिस कोठडीची मुदत मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सूर्यकांत येवलेकडे केलेली चौकशी महत्त्वाची मानली जात आहे.