

पुणे: अंत्योदय योजनेतील लाभार्थींना दर महिन्याला देण्यात येणारी प्रतिशिधापत्रिका एक किलो साखर तब्बल 14 महिन्यांनी उपलब्ध झाली आहे. पुढील सहा महिन्यांची साखर अन्नधान्य वितरण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे जमा केली आहे. त्यामुळे रेशनधारकांचे आगामी काळातील सण, उत्सव गोड होणार एवढे मात्र निश्चित.
अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रत्येक महिन्याला एक किलो साखर वितरित केली जाते. मात्र, राज्य सरकारकडून साखरेचा पुरवठा न झाल्याने मागील 14 महिन्यांपासून या लाभार्थींना साखर मिळालेली नव्हती. याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून पुढील सहा महिने साखर वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
सहा महिन्यांची एकत्रित साखर देण्यात आली असली तरी दर महिन्याला एक किलो असे पुढील सहा महिने प्रत्येकी एक किलो साखर देण्यात येणार आहे. साखर वितरणाबाबत तक्रारी येऊ नयेत यासाठीच एकत्रित सहा महिन्यांची साखर देण्यात आली आहे.
जिल्ह्यात अंत्योदय योजनेत 48 हजार 489 लाभार्थी आहेत. या लाभार्थींसाठी संपूर्ण सहा महिन्यांची एकूण 2 हजार 800 क्विंटल साखरेचा पुरवठा करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला दिले होते. त्यानुसार ही साखर प्राप्त झाली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली, तर पुणे शहरात अंत्योदय योजनेचे 8 हजार 932 लाभार्थी आहेत. त्यानुसार 460 क्विंटल साखर उपलब्ध झाल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी सांगितले.
नोव्हेंबर ते एप्रिल 2026 या सहा महिन्यांसाठी साखर उपलब्ध झाली असून, त्याचे वितरणही सुरू झाले आहे.
महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी