

पुणे: राज्य शासनाच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधीनस्त असलेल्या 13 सार्वजनिक अकृषी विद्यापीठांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये मुंबई विद्यापीठाचा प्रथम क्रमांक आला असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्वांत शेवटचे स्थान मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य शासनाकडून सेवाकर्मी कार्यक्रमात वेगवेगळे विभाग तसेच अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यात येत आहे. त्यानुसार त्यांच्या कामानुसार त्यांना गुण देखील देण्यात येत आहेत.
राज्यातील 13 सरकारी विद्यापीठांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे व डिजिटल करणे, सर्व संवर्गांची अद्ययावत ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करणे, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती, अनुकंपा नियुक्ती, बिंदुनामावली प्रमाणीकरण, सेवाप्रवेश नियम, सरळसेवा नियुक्ती रिक्त पद स्थिती, आयजीओटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन व 5 कोर्स पूर्ण करणे, यासाठी 100 गुण देण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील 13 विद्यापीठांना गुणदान करण्यात आले असून, विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या गुणांकनानुसार मुंबई विद्यापीठ मुंबई (80 गुण), एसएनडीटी महिला विद्यापीठ (77 गुण), गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली (69 गुण), यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक (68 गुण) या विद्यापीठांना सर्वाधिक गुण मिळाले आहेत. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्वाधिक कमी म्हणजे केवळ 52 गुण मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण 13 विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठाला सर्वांत शेवटचे स्थान मिळाल्याचे दिसून येत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड घसरताना दिसत आहे. त्यामुळे विद्यापीठाची एनआयआरएफ रँकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा घसरत असताना दुसरीकडे विद्यापीठाची प्रशासकीय घसरण देखील झाल्याचे दिसून येत आहे.