

पिरंगुट: मुळशी तालुक्यातील रिहे येथील रिंग रोडबाधित पशुपालक शेतकरी विलास रामचंद्र शिंदे यांचा गोठा व राहत्या घरावर प्रचंड पोलीस बंदोबस्तात बुलडोझर चालवून अतिशय निष्ठूरपणे कारवाई केली.
शिंदे यांच्या नावे असलेली जमीन सर्वे नंबर 578चा 4 रिंग रोडसाठी बाधित झाली आहे. सदर जमीन ही त्यांचे कुटुंबीय 70 ते 80 वर्षापासून कसत आहेत. सातबारावरही ते मालक आहेत, या जागेत त्यांचे आरसीसी घर, गोठा दोन खोल्या कुक्कुटपालन शेड होते. गोठ्यात 15 गायी होत्या. परंतु भावकीतील काही लोकांनी हरकत दाखल केल्यामुळे सदर जमिनीचा वाद न्यायालयात न्यायप्रवीष्ट असल्याने जमिनीच्या मोबदल्याचे 13 कोटी रुपये प्रशासनाने कोर्टाकडे सुपूर्त केलेले आहेत. ज्या वेळेस त्यांच्या जमिनीचा निकाल लागेल, त्यावेळी संबंधित शेतकरी शिंदे यांना त्यांचे ते पैसे मिळून जातील, असे मुळशी तालुक्याचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी सांगितले.
हातामध्ये रिंग रोडमध्ये
गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने जागा व घराचा ताबा देण्यास शिंदे तयार नव्हते. त्यांनी जनावरे व कुटुंब हलविलेले नव्हते. आठ दिवसांपूर्वीच प्रांतधिकारी यांनी सुनावणी लावली व त्यांना घराचा व गोठ्याचा मोबदला देऊ व नंतर ताबा घेतला जाईल, असे सांगितले होते. मात्र, 18 एप्रिल रोजी अचानक त्यांनी पोलीसबळाचा वापर करून घर, गोठा जमीनदोस्त केले आहे.
या कारवाईमुळे शिंदे यांच्या गायी बाहेर रखरखत्या उन्हामध्ये बांधण्याची वेळ आली. तसेच सर्व चारा व सामानाची नासधूस झाली आहे. प्रशासनाने त्यांना अगोदरच काही दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतरसुद्धा विलास शिंदे यांनी प्रशासनास शेवटच्या दोन दिवसांची मुदत मागितली होती. परंतु शासनाने काहीही ऐकून न घेता पोलीस व कामगारबळाचा वापर करून जनावरांचा गोठा उद्ध्वस्त केला असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
माझे राहते घर देखील पाडण्यात आले असून, माझे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली आले आहे. माझी गुरे उघड्यावर आली आहेत. त्याचबरोबर या तीव उन्हात व येणाऱ्या पावसाळ्यात मी राहायचे कुठे? त्याचबरोबर या दुभत्या जनावरांचे काय करायचे? व माझा उदरनिर्वाह कसा करायचा. हा मोठा प्रश्न माझ्याकडे उभा राहिला आहे.
विलास शिंदे