

पुणे /कोंढवा: दक्षिण पुण्यातील वाढती पाणीटंचाई, भरधाव टँकरमुळे होणारे अपघात, नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 20 एप्रिल) कोंढवा पोलिस ठाण्यात महत्त्वपूर्ण सामुदायिक बैठक पार पडली. या बैठकीत पाणीपुरवठा करण्यासाठी कोंढव्यासह परिसरात इतर ठिकाणी तीन पाण्याच्या टाक्या व पाइपलाइन कार्यान्वित करण्यात येतील, अशी हमी पालिकेच्या वतीने देण्यात आली.
एनआयबीएम ॲनेक्स, महंम्मदवाडी आणि उंड्री परिसरातील रहिवासी, पोलिस प्रशासन आणि महानगरपालिका अधिकारी एकाच व्यासपीठावर येत वाहतूक कोंडी, रस्ते सुरक्षा आणि पाणीटंचाई या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने टँकरचालक आणखी किती निष्पापांचे बळी घेणार, असे वृत्त प्रसिद्ध करून येथील अपघात व पाणी प्रश्नावर प्रकाश टाकला होता, या धर्तीवर नुकतीच बैठक पार पडली, त्यामध्ये ठोस निर्णय घेण्यात आला.
बैठकीला अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. तसेच पुणे महानगरपालिकेच्या पाणी विभागाचे प्रतिनिधी अधिकारी जगताप यांनीही सहभाग नोंदवला. नागरिकांमधून राज सिंग, शमिम हासिमखान पठाण, छबिल पटेल, अशोक मेंडाळे आणि शहनवाज शेख यांनी समस्यांची ठळक मांडणी केली. या भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या टँकरच्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली.
अरुंद रस्ते, वाढती वर्दळ आणि बेफाम वेग यामुळे पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणले. यावर उपाय म्हणून टँकरच्या वेळापत्रकाचे नियमन, वेगमर्यादा कडक करणे आणि संवेदनशील ठिकाणी पोलिस गस्त वाढवण्याचा प्रस्ताव चर्चेत पुढे आला. अधिकाऱ्यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेत, लवकरच ठोस उपाययोजना राबवण्याचे संकेत दिले. बैठकीत पोलिस, महानगरपालिका आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढवत ठोस कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. रहिवाशांनीही दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
चालक-मालकांनी मांडल्या अडचणी
टँकरचालक व मालकांनी आपल्याही अडचणी मांडल्या. पाणीपुरवठ्यासाठी निश्चित वेळेत काम पूर्ण करण्याचा दबाव, मर्यादित मार्ग, वाहतुकीतील अडथळे आणि वाढती मागणी यामुळे अनेक वेळा नियमांचे पालन करताना अडचणी येतात, असे त्यांनी स्पष्ट केले. काही भागांत पाण्याच्या उपलब्धतेअभावी टँकरवरच पूर्ण अवलंबित्व असल्याने सेवा खंडित करता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
वाहतूक विभाग काळेपडळ, वानवडी, फुरसुंगी, हडपसर आणि कोंढवा या परिसरातील नारिकांची तसेच टँकरचालक व मालक यांची कोंढवा पोलिस ठाण्यात बैठक पार पडली. अपघात होऊ नये व नारिकांना पाण्याचा पुरवठा सुरळीत राहावा, यावर चर्चा झाली. यावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी या परिसरात पाण्याच्या टाक्या बांधण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अपघात होऊ नये या दृष्टीनेही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
हिम्मत जाधव, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग, पुणे