

पुणे: राज्यातील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अर्थात एमएसबीटीईने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी सात हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
यासाठी १६ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. राज्यातील एमएसबीटीईशी प्रथमच संलग्न संस्थांमध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील.
औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी बारावी, तर अन्य अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमांसाठी दहावीच्या परीक्षेत किमान ७० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. संबंधित शैक्षणिक वर्षात अन्य कोणत्याही शिष्यवृत्तीचा किंवा शुल्कमाफीचा लाभ घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
प्रथम वर्षाबरोबरच द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थीही या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी प्रथम वर्षाची किंवा द्वितीय वर्षाची परीक्षा दोन्ही सत्रांचा एकत्रित निकाल विचारात घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संबंधित उपलब्ध शिष्यवृत्तीच्या जागांनुसार गुणवत्ता यादीच्या आधारे लाभ दिला जाणार आहे.
असे आहे शिष्यवृत्तीचे वेळापत्रक
२४ डिसेंबर २०२६ ते ८ जानेवारी २०२७ या कालावधीत संस्थांना अर्ज व कागदपत्रे संबंधित प्रादेशिक तंत्र शिक्षण मंडळाकडे सादर करावी लागतील. ११ ते २५ जानेवारीदरम्यान अर्जाची छाननी होईल. १ फेब्रुवारी २०२७ रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर २ ते ९ फेब्रुवारीदरम्यान विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत हरकती किंवा शंका नोंदवता येतील. अंतिम यादी दि. १५ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल, तर २२ फेब्रुवारी २०२७ रोजी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.