

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने घेतलेल्या औषध निरीक्षक पदभरतीत पेपर फुटल्याचे आम्ही पुराव्यासह सादर केल्यानंतरही आयोग मान्य करत नव्हते. सततचा पाठपुरावा आणि विद्यार्थ्यांच्या दबावापुढे सरकारला नमावे लागले. ‘एमपीएससी’ने मंगळवारी रात्री उशिरा पेपर फुटल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आता आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा; अन्यथा विद्यार्थ्यांसह येत्या १ सप्टेंबरला थेट कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
पुण्यात नवी पेठमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत राज्य लोकसेवा आयोगाच्या कामकाजाचा पवार यांनी समाचार घेतला. आयोगाच्या अध्यक्षपदी स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली. एमपीएससीच्या औषध निरीक्षक (गट-ब) परीक्षेचा पेपर फुटला होता. त्याचा पाठपुरावा करून पेपर रद्द करण्यासाठी रोहित पवार यांनी संबंधित यंत्रणेकडे प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. रोहित पवार म्हणाले, ऋषिकेश गांगुर्डे यांनी तक्रार केली आणि त्याला वेळोवेळी आम्ही साथ दिली.
या प्रकरणात तीन अधिकाऱ्यांसह अन्य सहा व्यक्तींची नावे एफआयआरमध्ये असल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवू नये, “एकाच विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका देण्यात आली होती, असे सांगणे योग्य नाही. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचल्याची माहिती आमच्याकडे आहे. याबाबत आम्ही पोलिसांना विविध पुरावे आणि नावे दिली आहेत,” असे पवार म्हणाले. प्रश्नपत्रिका मोठ्या रकमेला विकली गेल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
विद्यार्थ्यांचा संघर्ष
पुणे, नाशिक, नागपूरसारख्या शहरांत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी १० बाय १०च्या खोलीत राहतात. काही जण क्लासेसमध्येच अंघोळ करतात. १८-२० तास अभ्यास करून अवघी १-३ तास झोप घेतात. आर्थिक परिस्थितीमुळे पोहे, चहा- बिस्किटांवर दिवस काढावा लागतो. एक- दोन संधी हुकल्यानंतर मुलींवर लग्नाच्या चर्चेचा दबाव येतो. अशा परिस्थितीत विद्यार्थी मोठ्या संघर्षातून आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतात, असे रोहित पवार यांनी सांगितले.
बार्टीसह संस्थांच्या वयोमर्यादेला विरोध
बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत आणि टीआरटीआय या संस्थांमधील योजनांसाठी ३० वर्षांची वयोमर्यादा विद्यार्थ्यांना मान्य नसल्याचे पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अधिक शिक्षण घेण्याची संधी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर
राज्यातील मुला- मुलींसाठी राहुल गांधी पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात येणार असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ते भेट देण्याची शक्यता असल्याचे पवार यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने कागदोपत्री निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
ऑनलाइनऐवजी ऑफलाइन परीक्षा घेण्याची मागणी
एमपीएससीच्या आगामी परीक्षा ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणीही त्यांनी केली. पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी आपण यापूर्वी विधानसभेत केली असून, त्यासाठी खासगी विधेयकही मांडल्याचे पवार यांनी सांगितले.