

पुणे: एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटू नका. पुढील २४ तासांत राजीनामा झाला नाही, तर मुंबईत येऊन आंदोलन पुढे न्या, असे आवाहन शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या आंदोलनाचा मंगळवारी सहाव्या दिवशी ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले. ठाकरे म्हणाले, तुमचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. आता आंदोलनाची एकजूट तुटू देऊ नका, असे त्यांनी सांगितले.
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, खासदार संजय सिंह, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पाटील, तुषार गांधी, रोहिणी खडसे आदींनीही आंदोलकांची भेट घेतली. भीमनवार ही प्यादी आहेत. त्यांच्या मागे असलेल्या मोठ्या नेत्यांची जबाबदारी निश्चित झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही, असा आरोप ठाकरे यांनी केला.
विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले की, त्यांना देशविरोधी किंवा 'अर्बन नक्षल' ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी केला. पेपर, निवडणूक, कंपन्या आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर फूट पाडण्याचे प्रयत्न झाले; विद्यार्थ्यांची एकजूट मात्र फुटू देऊ नका, असे ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी अध्यक्षांना हटविण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याचे स्पष्ट केले असून, अध्यक्ष आणि माजी अध्यक्षांच्या न्यायालयीन चौकशीची भूमिका मांडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी कार्यालयाच्या दारात आंदोलन करण्याचा पर्यायही सुचविला. अधिकारी तुमच्या दारात आले नाहीत, तर तुम्ही त्यांच्या दारात जा, असे ते म्हणाले. दरम्यान, अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी केला आहे. या दाव्यावर सरकारकडून अंतिम निर्णय झालेला नसल्याने आंदोलनाची पुढील दिशा महत्त्वाची ठरणार आहे.