Keshavnagar Railway Underpass: कोट्यवधींचा रेल्वे अंडरपास तयार; जोडरस्ता नसल्याने केशवनगरचा पर्यायी मार्ग धूळ खात

हडपसर-खराडी मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता; रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया अद्याप सुरू नाही
Keshavnagar Railway Underpass
Keshavnagar Railway UnderpassPudhari
Published on: 
Updated on: 

नितीन वाबळे

मुंढवा: हडपसर ते खराडी या मुख्य रस्त्याला महत्त्वाचा पर्यायी मार्ग ठरू शकणाऱ्या केशवनगर येथील आनंदनगरच्या पाठीमागील रेल्वे अंडरपासचे (भुयारी मार्ग) काम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, महापालिकेच्या नियोजनाअभावी अंडरपासला जोडणारा मुख्य रस्ताच अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला अंडरपास सध्या वापराविना पडून आहे. यामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Keshavnagar Railway Underpass
Dhayari Nanded Traffic: धायरी-नांदेड परिसरात वाहतूक कोंडीचे ग्रहण; ५ किलोमीटरसाठी तासभराचा प्रवास

अमनोरा सिटीच्या पाठीमागील रेल्वे मार्गाखाली हा अंडरपास तयार करण्यात आला असून, तो केशवनगरमधील आनंदनगरच्या बाजूला निघतो. येथून केशवनगर-मांजरी रस्ता ओलांडून रेणुकामाता मंदिर चौकातून नदीपात्रावरील पुलाच्या मार्गे थेट खराडीकडे जाता येते. त्यामुळे हा मार्ग सुरू झाल्यास वाहनचालकांना मोठा फायदा होण्याबरोबरच मुंढवा येथील महात्मा फुले चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

Keshavnagar Railway Underpass
Subhash Katkar Transfer: पुणे विभागीय कृषी सहसंचालकपदी सुभाष काटकर; जेजुरकरांचा अतिरिक्त पदभार संपला

मुंढवा येथील महात्मा फुले चौकात सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत केशवनगर-आनंदनगर पाठीमागील रेल्वे अंडरपासला जोडणारा रस्ता तातडीने सुरू झाल्यास वाहनधारकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतो. मात्र, या रस्त्याच्या कामाबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने प्रशासकीय समन्वयाचा अभाव समोर आला आहे.

'जोडरस्ता करायचा नव्हता, तर अंडरपास बांधून जनतेच्या पैशांचा अपव्यय का केला?' असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जोडरस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Keshavnagar Railway Underpass
Maharashtra Sports Policy: क्रीडा आरक्षणाचा ‘तीन ऑलिम्पिक’ निकष खेळाडूंच्या मुळावर; महाराष्ट्राच्या नव्या क्रीडा धोरणावर संताप

डीपी रस्त्याच्या निम्म्या जागेवर बांधकामे

या भागाच्या विकास आराखड्यात संबंधित रस्ता १८ मीटर रुंदीचा प्रस्तावित आहे. मात्र, प्रत्यक्षात या जागेपैकी सुमारे नऊ मीटर भागात घरे व इतर बांधकामे असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. उर्वरित नऊ मीटर जागा रस्त्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्यासाठी आवश्यक जागा कधी ताब्यात घेतली जाणार आणि प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

यंदा निधीची तरतूद नाही; काम लांबणीवर

महापालिकेच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात या रस्त्याच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या केवळ आवश्यक जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील वर्षी निधी मंजूर झाल्यानंतरच प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे हा पर्यायी मार्ग सुरू होण्यासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.

Keshavnagar Railway Underpass
Pune Navratri Dandiya Garba Events: पुण्यात नवरात्रोत्सवाचा दांडिया-गरबा जल्लोष; १०० हून अधिक कार्यक्रमांची धूम

या रस्त्यासाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. तसेच, चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात या रस्त्याच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात निधी मंजूर झाल्यानंतरच रस्त्याचे काम हाती घेण्यात येईल.

अनिल सोनवणे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news