

बाणेर: सूस- बाणेर- पाषाण प्रभाग क्रमांक 9 नऊमध्ये एकूण 36 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 14 जणांनी अर्ज माघारी घेतली. तर निवडणुकीच्या रिंगणात सध्या प्रभाग नऊमध्ये 22 उमेदवार उतरणार आहेत. या प्रभागातील भाजपच्या बंडखोरांना थंड करण्यात त्यांना यश आले. परंतु, राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मात्र निवडणुकीच्या रिंगणात दिसणार असणार आहेत, त्याचा फटका राष्ट्रवादीला बसणार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रभाग क्रमांक 9 मधील भाजपचे उमेदवार विशाल गांधीले, लक्ष्मी दळवी, ऐश्वर्या कोकाटे आदिंनी अर्ज माघारी घेतले. त्यांनी पुन्हा भाजपला पाठिंबा दर्शवल्याने त्यांची ताकद वाढली आहे. तर राष्ट्रवादीतील राहुल बालवडकर यांनी अर्ज मागे घेतला आहे. परंतु, राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद निम्हण व राष्ट्रवादी पुणे शहर कार्याध्यक्षा पूनम विधाते यांनी अर्ज माघारी घेतला नसल्याने ते या निवडणुकीत झालेल्या अन्यायाविरुद्ध जोमाने लढा देणार असल्याचे लक्षात येत आहे. तसेच, या प्रभागात राष्ट्रवादी शरद पवार गटातून जयेश मुरकुटे यांची उमेदवारी निश्चित झाली असून तेही या निवडणुकीच्या रिंगणात ताकतीने उतरणार असल्याचे लक्षात येत आहे.
यामुळे प्रभाग क्रमांक 9 ब गट व क गटामध्ये लढत चुरशीची होणार असल्याचे लक्षात येत आहे. ही लढत तिरंगी पाहावयास भेटल, असेही नागरिकांच्या चर्चेत येत आहे. अपक्ष उमेदवारांचा फायदा पक्षाचे उमेदवाराला होणार की पक्षाच्या उमेदवारांचा फायदा अपक्षला होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच अमोल बालवडकर हे भाजपमधून राष्ट्रवादी आल्याने ते राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने त्यांचा किती फायदा राष्ट्रवादीच्या प्रभागाला होणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.