

दिगंबर दराडे
पुणे: पुणे शहरात यंदा नव्या घरांच्या विक्रीत सुमारे 20 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. आयटी क्षेत्रातील नोकरकपात, जागतिक भू-राजकीय अस्थिरता, अमेरिकेने लादलेले शुल्क तसेच वाढलेले गृह कर्जावरील व्याजदर, यांचा थेट परिणाम घरबाजारावर झाल्याचे निरीक्षण नोंदविले जात असतानाच पुणेकरांनी मात्र लक्झरी घर खरेदी करण्याला पसंती दिल्याचे वास्तव समोर आले आहे.
मालमत्ता सल्लागार संस्था अनारॉकच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 2025 मध्ये पुण्यात 65,135 नव्या सदनिकांची विक्री झाली, तर मागील वर्षी हा आकडा 81,090 इतका होता. देशातील सात प्रमुख महानगरांमध्ये नव्या घरांच्या विक्रीत सरासरी 14 टक्के घट झाली असून, हैदराबादमध्ये सर्वाधिक 23 टक्के, मुंबई महानगर प्रदेशात 18 टक्के, तर कोलकात्यात 12 टक्के घसरण झाली आहे.
यामध्ये चेन्नई हे एकमेव शहर ठरले असून, तेथे घर विक्रीत 15 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, रिअल इस्टेट क्षेत्रात प्रीमियमायझेशनचा कल वाढत असून, मोठ्या आकाराच्या व अधिक सुविधायुक्त घरांची मागणी वाढत आहे. क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन यांनी सांगितले की, एकात्मिक टाऊनशिपमध्ये 2, 3, 4 बीएचके घरांकडे ग््रााहकांचा कल वाढताना दिसत आहे.
बाणेर, पुनावळे, रावेत, हिंजवडी, खराडी, डेक्कन आणि कोथरूड यांसारख्या नव्या कॉरिडॉरमध्ये लक्झरी व प्रीमियम प्रकल्पांवर विकासकांचा भर आहे. मात्र, परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांची संख्या घटल्याने मध्यमवर्गीय खरेदीदारांनी घरखरेदी पुढे ढकलल्याचे चित्र दिसत आहे. बाजार स्थिर असला तरी उच्च मूल्याच्या व्यवहारांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचा रोख बदलत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सात प्रमुख महानगरांमध्ये सरासरी 14 टक्के घट नोंदवली गेली असून, हैदराबाद आणि मुंबई महानगर प्रदेशात मोठी घसरण दिसून आली आहे.
एकात्मिक टाऊनशिपमध्ये 2, 3 व 4 बीएचकेसह मोठ्या आणि सुविधायुक्त घरांची मागणी वाढत असल्याचे चित्र आहे.
परवडणाऱ्या प्रकल्पांची संख्या घटल्याने मध्यमवर्गीय खरेदीदारांनी घर खरेदी पुढे ढकलली असून, बाजाराचा रोख उच्च मूल्याच्या व्यवहारांकडे वळत आहे.