

पुणे: राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने शहर जिल्ह्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरू आलेल्या रिंग रोडचे आत्तापर्यंत 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यातही पश्चिम टप्प्याचे काम प्रगतिपथावर असून, येत्या दोन वर्षांत (2028 पर्यंत) काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. तर, पूर्व टप्प्याचे कामही सुरू झाले आहे. दरम्यान, रिंग रोडच्या 31 किलोमीटरच्या कामासाठी नव्याने निविदा काढण्यात आल्या आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी ’एमएसआरडीसी’कडून रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. महामंडळाकडून हे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांत केले जात आहे. पश्चिम टप्प्याचे काम सुमारे 20 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. पावसाळा संपल्यामुळे या कामाला आता वेग आला असून, मे अखेर महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पश्चिम टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची अर्थात डिसेंबर 2027 अखेर अशी मुदत दिली आहे. त्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती वसईकर यांनी दिली. तर पूर्व टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी मे 2028 ची मदत दिली आहे. त्यावेळी संपूर्ण रिंग रोड पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पूर्वेकडील टप्प्यात एनएचआयने पुणे-संभाजीनगरदरम्यान ग््राीन कॉरिडोरचे काम हाती घेतले आहे. हा प्रस्तावित रस्ता आणि रिंग रोड काही ठिकाणी एकत्र येत असल्यामुळे नगर रस्त्यापासून सोलापूर रस्त्याला आणि पुढे पुणे-बंगळूर रस्त्याला जोडणाऱ्या रिंग रोडचे 31 किलोमीटर रस्त्याचे काम प्राधिकरणाने करावे, असे यापूर्वी ठरले होते. परंतु, मध्यंतरी प्राधिकरणाने निर्णयात पुन्हा बदल करत हे काम महामंडळानेच करावे, असे सुचविले.
त्यानुसार हा रस्ता पुन्हा महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. महामंडळाने यासाठी स्वतंत्र निविदा काढल्या होत्या. मात्र, त्या 35 टक्के जादा दराने निविदा आल्यामुळे या निविदा रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासाठी आता फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत. निविदा अंतिम करून लवकरच त्याचे कामही सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पश्चिम टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे