Maza Bappa 2026: ‘माझा बाप्पा २०२६’मधून विद्यार्थ्यांच्या हातून साकारला पर्यावरणपूरक गणपती!

पवार पब्लिक स्कूलमध्ये शाडूमातीच्या गणेशमूर्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘माझा गणपती-माझी जबाबदारी, माझा निसर्ग-माझी जबाबदारी’चा विद्यार्थ्यांचा संदेश
Maza Bappa 2026
Maza Bappa 2026Pudhari
Published on
Updated on

खडकवासला: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढारी माध्यम समूह, पुणे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ‘माझा बाप्पा : २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत नांदेड सिटी येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये सोमवारी (दि. ३१) शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारण्याची कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या हातांनी लाडक्या बाप्पाची मूर्ती घडविली. मातीला आकार देताना विद्यार्थ्यांनी गणेशभक्तीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही आत्मसात केला.

Maza Bappa 2026
Dalit Literature and Art Movement: ‘समता-बंधुतेचा विचार रुजविणाऱ्या दलित साहित्य-कलेची समाजाला गरज’

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या उपक्रमाची सुरुवात गणेशवंदनेने झाली. पवार पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सुरेख गायन सादर केल्याने परिसरातील वातावरण भक्तिमय आणि प्रफुल्लित झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाडूमातीचा गोळा हातात घेत आपल्या कल्पनाशक्तीला आकार देत गणेशमूर्ती साकारण्यास सुरुवात केली.

स्वतःच्या हाताने घडविलेला बाप्पा समोर येताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता.भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टचे प्रा. सुनील देशपांडे, प्रा. ओंकार पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.

Maza Bappa 2026
Pune Ganeshotsav Moving Tableaux: गणेशोत्सवातील हलते देखावे बदलले; बिबट्या-मानव संघर्षापासून मोबाइलच्या दुष्परिणामांपर्यंत सामाजिक विषयांचा जागर

विद्यार्थ्यांना स्वच्छतेचेही धडे

कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे तंत्र, मूर्ती घडविताना घ्यावयाची काळजी, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे संभाव्य जलप्रदूषण तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता निसर्गसंवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारा उत्सव व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या वेळी माध्यमिक विभागाच्या प्रमुख मधुश्रीला रक्षित, प्राथमिक विभागाच्या प्रमुख भाग्यश्री पाटील, लीना पेशवे, समन्वयक योगेश्वर माळी, पराग कुवर, कलाशिक्षक दिलीप पवार, ऐश्वर्या सोमन, अबोली देशपांडे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Maza Bappa 2026
Pune Ganeshotsav: ‘पुणे पॅटर्न’ने साजरा करूया गणेशोत्सव; डीजे, प्रेशर मिड अन् प्लाझ्माला पोलिसांचा ठाम विरोध

बाप्पासोबत सर्जनशीलतेलाही आकार

मातीला आकार देताना विद्यार्थ्यांनी केवळ गणेशमूर्ती साकारली नाही, तर त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला देखील आकार दिला आहे. स्वतःच्या हाताने बाप्पा घडविण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आहे. त्याचबरोबर शाडूमातीचा वापर, पर्यावरणपूरक विसर्जन आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सव याबाबतची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे ही या कार्यशाळेची खरी फलश्रुती असल्याचे पवार पब्लिक स्कूलचे कलाशिक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.

माझा गणपती-माझी जबाबदारी..!

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी 'माझा गणपती-माझी जबाबदारी, माझा निसर्ग-माझी जबाबदारी' हा संदेश दिला. स्वतःच्या हाताने शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारताना विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजले. मूर्ती घडविण्याबरोबरच पर्यावरणपूरक विसर्जन, जलप्रदूषण टाळणे आणि निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजी घेण्याची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली. तसेच विद्यार्थ्यांनी यापुढे पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्पही केला.

Maza Bappa 2026
Pune Cantonment Board GST Arrears: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची ७५० कोटींची जीएसटी थकबाकी; दशकभरापासून बैठका सुरू, निधीचा मात्र पत्ता नाही!

आपली संस्कृती आणि पर्यावरण यांचा अतूट संबंध आहे. शाडू मातीचा वापर करून गणेशमूर्ती तयार केल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना प्रत्यक्षात आणता येते. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक सवयी स्वतः अंगीकारून त्या कुटुंब आणि समाजापर्यंत पोहोचवाव्यात. हा उपक्रम आमच्या शाळेत राबविल्याबद्दल 'पुढारी' समूहाचे मनपूर्वक आभार.

डॉ. अंजली गुर्जर, प्राचार्य, पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती साकारताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा या उपक्रमाचा सर्वात मोठा आनंद आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.

ॲड. नरसिंग लगड, संचालक, नांदेड सिटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news